
दहावी-बारावीत आवडीच्या विषयांची मुभा
मुंबई, ता १६ : नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. त्यानुसार दहावी-बारावी परीक्षेचे अवास्तव महत्त्व कमी करून विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञानापेक्षा आवडीचे विषय निवडण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात या विषयावर मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आज शालेय शिक्षण विभागाने राज्यस्तरीय समन्वयासह नियंत्रण मार्गदर्शनासाठी शिक्षण प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची आंतरविभागीय समिती गठीत केली. या धोरणाच्या पहिल्या पाच वर्षामध्ये पूर्व प्रथामिक शिक्षणाची तीन वर्ष आणि इयत्ता पहिली आणि दुसरीचा समावेश आहे. विद्यार्थी तिसरीत येईपर्यंत त्यास वाचन आणि लेखन करण्यास सक्षम बनवण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात येणार आहे. या प्रकारे अभ्यासक्रमामध्ये निर्मितीसाठी स्थानिक खेळणी, स्थानिक भाषांचा समावेश असून आनंददायी अभ्यासक्रमतयार करण्यात येणार आहे.
तिसरी ते पाचवी या वर्गामध्ये कृती व खेळ आधारित परस्पर संवादी अभ्यासक्रम विकसित केला जाणार आहे. त्यानंतर इयत्ता सहावी ते आठवीसाठी कृती आधारित प्रायोगिक अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक हस्तकला व कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यात येणार आहे. इयत्ता नववी ते बारावी या चार वर्षात ४० वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीप्रमाणे विषय घेण्याची मुभा देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
--
विविध विभागांचा समन्वय
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभागासोबतच महिला व बालकल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, इतर मागास बहुजन विभाग, आदिवासी विकास विभाग आणि कौशल्य विकास व उद्योजकता विभाग हे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. त्यासाठीची सूचना जीआरमध्ये करण्यात आली आहे.