
कृपया ही बातमी घ्यावी बदल केले आहेत.
‘शताब्दी’मध्ये एचआयव्हीबाधितांसाठी डायलिसीस युनिट
उपनगरीय रुग्णालयांपैकी पहिलेच केंद्र
भाग्यश्री भुवड, मुंबई
एचआयव्ही संसर्गित आणि गंभीर मूत्रपिंड आजारांनी ग्रस्त रुग्णांना नियमित लागणाऱ्या डायलिसिसची सुविधा कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थात शताब्दी रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. एचआयव्हीबाधितांना मूत्रपिंडाचा गंभीर आजार झाला, की डायलिसीससाठी पालिका रुग्णालयाचे हेलपाटे मारावे लागत होते; पण ती समस्या आता कमी होण्यास मदत होणार असून एचआयव्ही बाधितांना दिलासा मिळणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात बाह्यरुग्ण तत्त्वावर (ओपीडी) डायलिसीससाठीची एक मशीन फक्त एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी देण्यात आली आहे. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांसाठीच सुविधा उपलब्ध आहे. एचआयव्ही रुग्णांना अनेकदा प्रतीक्षा करावी लागते. अशातच शताब्दी रुग्णालयातील डायलिसीसची स्वतंत्र मशीन एचआयव्ही बाधितांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ७ डिसेंबरपासून डायलिसीस युनिट सुरू झाले. तेव्हापासून आतापर्यंत चार एचआयव्ही बाधित रुग्णांच्या डायलिसीसच्या १४ सायकल्स पूर्ण झाल्या आहेत, असे रुग्णालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांत दाखल रुग्णांसाठी आपात्कालीन परिस्थितीत डायलिसीसची सुविधा आहे; पण एचआयव्ही रुग्णांसाठी समर्पित एकही केंद्र नव्हते. त्यासाठी वर्षभरापासून मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीकडून पाठपुरावा केला जात होता. अखेर पहिले युनिट डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात सुरू झाले. महापालिकेतर्फे चालवण्यात येणाऱ्या शताब्दी रुग्णालयात एक खाट राखीव ठेवण्यात आली आहे. केईएम, नायर, सायन, कूपर आणि उपनगरांतील आऊटसोर्सिंग केलेले राजावाडी रुग्णालय (घाटकोपर), पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालय (गोवंडी) आणि म. वा. देसाई रुग्णालय (मालाड पूर्व) या ठिकाणी असलेल्या डायलिसीस केंद्रांमध्ये एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी एक खाट राखीव आहे. आऊटसोर्सिंग केलेल्या डायलिसीस केंद्रांमध्ये एचआयव्हीबाधित रुग्णांच्या डायलिसीससाठी एक खाट राखीव ठेवण्यात यावी, अशीही अट आहे. शताब्दी रुग्णालयात एक खाट राखीव ठेवण्यात आली असून ती कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.
वाढती गरज
दरवर्षी मुंबईतील मूत्रपिंड आजारांनी ग्रस्त शंभरहून अधिक एचआयव्हीबाधितांना डायलिसीसची गरज भासते. दरवर्षी सरासरी ३० ते ४० नवीन रुग्ण डायलिसीससाठी दाखल होतात. मुंबईसारख्या शहरात एचआयव्हीबाधित रुग्णांच्या डायलिसीसची गरज वाढत असल्याने बाह्यरुग्ण तत्त्वावर (ओपीडी) आणखी केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.
अनेक अडथळ्यांचे आव्हान
केईएम आणि सायन रुग्णालयांत एचआयव्हीबाधित दाखल रुग्णांनाच डायलिसीसची सुविधा आहे. खासगी केंद्रामध्ये एका डायलिसीससाठी तीन ते चार हजार रुपये मोजावे लागतात. शिवाय प्रवासाचा खर्च आणि डायलिसीसच्या किटसाठी किमान दोन हजार रुपये खर्च येतो. असा एका वेळचा खर्च पाच ते सहा हजारांपर्यंत जातो. जर रुग्णाला आठवड्यातून तीन दिवस डायलिसीस करायचे असेल, तर महिन्याला किमान ५० हजार रुपये लागतात. अशा न परवडणाऱ्या उपचारांच्या खर्चामुळे रुग्ण डायलिसीस सोडून देतो. शताब्दी रुग्णालयात सुरू झालेली सुविधाही सध्या अपुरी पडत आहे. त्यामुळे पालिकेने एचआयव्हीबाधितांसाठी जास्तीत जास्त केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी पूर्णता सामाजिक संस्थेचे प्रकल्प संचालक ॲन्थोनी डिसोझा यांनी केली.