
प्रदीप शर्माचा जामीन अर्ज फेटाळला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेला चकमकफेम पोलिस अधिकारी प्रदीप शर्माचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज नामंजूर केला. न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठाने याचिकेवर निकाल जाहीर केला. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझेला शर्माने मदत केली. हिरेनची हत्या घडवण्यात शर्माचा सहभाग होता, असा आरोप ‘एनआयए’ने केला आहे.
मागील वर्षी विशेष न्यायालयाने शर्माचा जामीन अर्ज नामंजूर केला होता. अत्यंत थंड डोक्याने शर्माने हे हत्याकांड घडवून आणले, असा गंभीर आरोप अभियोग पक्षाने केला आहे; मात्र यामध्ये माझा सहभाग नाही, असा बचाव शर्माच्या वतीने करण्यात आला. लोकांमध्ये (अंबानी कुटुंबासह) दहशत निर्माण करण्याची शर्माची टोळी आहे, असेही ‘एनआयए’ने म्हटले आहे. हिरेनला या कटाची माहिती होती; मात्र तो कदाचित यामध्ये त्रासदायक ठरू शकतो, यामुळे त्याचा काटा काढण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वाझे सध्या कारागृहात असून खंडणीवसुलीच्या अन्य प्रकरणात माफीचा साक्षीदार आहे.