मुंबई विद्यापीठात छायाचित्रण स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठात छायाचित्रण स्पर्धा
मुंबई विद्यापीठात छायाचित्रण स्पर्धा

मुंबई विद्यापीठात छायाचित्रण स्पर्धा

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांतील शैक्षणिक विभागातील एकूण ७९ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धकांनी विद्यानगरी संकुलातील विविध दृश्ये त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करून उपस्थितांची आणि परीक्षकांची वाहवा मिळवली. या छायाचित्रण स्पर्धेत प्रथम पारितोषिक एलिसन लेमोस यांनी पटकावले; तर नीलेश बाबरे यांना द्वितीय पारितोषिक, क्षितिज खंदारे यांना तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक करण सोलंकी, आदित्य खरडे, वरद देसाई आणि अथर्व वत्सराज यांना प्रदान करण्यात आले. प्रथम क्रमांकास रुपये ७ हजार आणि प्रशस्तिपत्र, द्वितीय क्रमांकास रुपये ५ हजार आणि प्रशस्तिपत्र, तृतीय क्रमांकास रुपये ३ हजार आणि प्रशस्तिपत्र आणि उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये १ हजार आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नितीन केणी, समाधान पारकर आणि सुप्रसिद्ध छायाचित्रकार मिलिंद केतकर यांनी काम पाहिले.
बाळासाहेब ठाकरे यांचा विचार-वारसा वृद्धिंगत होण्यासाठी आणि त्या विचारपैलूंचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राची स्थापना केली आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी समाजोन्नतीसाठी केलेल्या कार्याचा व त्यांच्या विचारसरणीचा अभ्यास करण्यासाठी चर्चासत्रे, परिषद, व्याखाने इत्यादीचे आयोजन करणे, देशातील सामाजिक व आर्थिक विषयांवर उच्चतम संशोधनास प्रोत्साहन आणि समर्थन देणे, विविध कौशल्ये आणि ज्ञानाचा वापर करून नवनेतृत्व घडवणे, विविध संस्कृतींमधील देवाणघेवाण आणि सामर्थ्य यांचा अभ्यास करणे आणि प्रभावी उपक्रमाद्वारे स्थानिक विद्यार्थी युवक-युवतींचे नेतृत्वगुण विकसित करणे, हे प्रमुख उद्देश या महत्त्‍वपूर्ण अध्यासन केंद्राचे आहेत. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यातील कला आणि त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी या ‘छायाचित्रण स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते.