कोकण शिक्षक मतदार संघात आज मतदान

कोकण शिक्षक मतदार संघात आज मतदान

मुंबई, ता. २९ : कोकण शिक्षक मतदारसंघात सोमवारी (ता. ३०) पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ९८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्याचबरोबर औरंगाबाद, नागपूर या शिक्षक मतदारसंघात आणि नाशिक, अमरावती या पदवीधर मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

कोकण शिक्षक मतदारसंघात सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होईल. ते दुपारी ४ पर्यंत चालेल, तर मतमोजणी २ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन सेक्टर -२४ इथे होणार आहे. चारही जिल्ह्यांतील सर्व कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सुट्टी जाहीर केली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात ८ उमेदवार मैदानात असून एकूण ९८ मतदार केंद्रांवर ३८ हजार ५२९ मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक २७ मतदान केंद्रे आहेत. त्या खालोखाल ठाण्यात २०, सिंधुदुर्गात १९, रत्नागिरीत १७ आणि पालघर जिल्ह्यात सर्वात कमी १५ मतदान केंद्रे आहेत.

कोकण शिक्षक मतदारसंघात यंदा खूप मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी संस्थाचालकांकडून करण्यात आल्याचा आरोप उमेदवारांकडून केला जात आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून अशा बोगस मतदारांवर खास नजर ठेवली जाणार असल्याने येत्या काळात अशा मतदारांवर मोठी कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. प्रचारादरम्यान शिक्षक मतदारांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशांचे प्रलोभन दाखवण्यात आली; तर काही उमेदवारांकडून दिवंगत माजी आमदार रामनाथ मोते यांच्या नावाने मते मागण्याचा प्रकारही करण्यात आला. या वेळी जुनी पेन्शन हा एकच विषय सर्वाधिक चर्चेत राहिला. शिंदे गट-भाजप युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या प्रचारासाठी तब्बल दोन डझनहून अधिक आमदार, एक डझनहून अधिक मंत्री प्रचारात उतरले होते. शिवाय ठाणे, नवी मुंबईतील आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्याची मोठी फौज लावण्यात आली होती. त्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांनी प्रत्येक शाळांमध्ये जाऊन प्रचार केला. या निवडणुकीत म्हात्रे आणि बाळाराम पाटील या दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत दिसत असली तरी शिक्षक भारती आणि इतर अपक्ष उमेदवारांनीही जोरदार तयारी केली आहे.
--
मतदार आणि मतदारसंघ
जिल्हा स्त्री मतदार पुरुष मतदार एकूण मतदार मतदान केंद्र
पालघर ४४१७ -२४२७ -६८४४ -१५
ठाणे ९२७१ -६०२९ -१५३०० -२०
रायगड ५७४६ -४३५५ -१०१०१ - २७
रत्नागिरी १३७८ -२७४२ -४१२० -१७
सिंधुदुर्ग ७०८ -१४५६ -२१६४ -१९
एकूण २१५२० -१७००९ -३८५२९ -९८
--
मतदारांसाठी आवश्यक सूचना
- उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रमाच्या रकान्यातच पसंतीक्रम नोंदवणे
- जांभळ्या शाईच्या पेनानेच मतपत्रिकेवर पसंतीक्रम अनिवार्य
- पसंतीक्रमाचे आकडे मराठी, इंग्रजी किंवा रोमन भाषेतच नोंदवावेत. अक्षर, चिन्हाद्वारे पसंतीक्रम नोंदवल्यास मतपत्रिका रद्द होईल.
- मतपत्रिकेवर किमान ‘१’ या अंकाचा पसंतीक्रम नोंदवणे अनिवार्य.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com