आरे जंगलात ‘अ‍ॅडव्हेंचर पार्क’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरे जंगलात ‘अ‍ॅडव्हेंचर पार्क’
आरे जंगलात ‘अ‍ॅडव्हेंचर पार्क’

आरे जंगलात ‘अ‍ॅडव्हेंचर पार्क’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘पिकनिक पॉइंट गार्डन’जवळ बेकायदा काम सुरू आहे. यामुळे आरे कॉलनीत महत्त्वाच्या ‘इको सेन्सिटिव्ह झोन’संबंधी (ईएसझेड) अधिसूचनेचे उल्लंघन होत आहे. यावर तात्काळ कडक पावले उचलत ठोस कारवाई करण्याची मागणी ‘सेव्ह आरे’चे कार्यकर्ते झोरू भाथेना यांनी केली आहे.
आरे येथील पिकनिक पॉइंट हा गार्डन उद्यानाच्या अधिसूचित इको सेन्सिटिव्ह झोनअंतर्गत येतो. या अधिसूचना आरे परिसराच्या नैसर्गिक पर्यावरणाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी आहेत. त्यानुसार मनोरंजनाच्या उद्देशाने नियोजित केलेली उद्याने आणि खुल्या जागा व्यावसायिक कामांसाठी वापरल्या जाणार नाहीत किंवा त्यांचे इतर क्षेत्रांमध्ये रूपांतर केले जाणार नाही, अशी तरतूद ईएसझेड अधिसूचना कलम ३(१) मध्ये करण्यात आली आहे. असे असूनही आरे जंगल परिसरामध्ये अवैध हालचाली सुरू आहेत. पिकनिक पॉइंट गार्डनच्या आसपास ‘अ‍ॅडव्हेंचर पार्क’ उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबतच्या जाहिरातीचे फलक आरे परिसरामध्ये जागोजागी लावण्यात आले असून हे सर्व धक्कादायक असल्याचे ‘सेव्ह आरे’चे कार्यकर्ते झोरू भाथेना यांनी सांगितले. तसेच ईएसझेड अधिसूचनेच्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाथेना यांनी महापालिका आयुक्त आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडे केली आहे.

पिकनिक पॉइंट गार्डनमध्ये विविध उपक्रम सुरू आहेत. यामध्ये, नैसर्गिक प्रवाहाला वळवण्यात आले आहे. हे ईएसझेड अधिसूचनेच्या कलम ३(२) चे उल्लंघन असून आणि झाडे तोडणे मनाई कलमाचे उल्लंघन आहे. यामुळे या परिसराच्या संरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला असून या क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी तातडीची पावले उचलण्याची गरज आहे.
– झोरू भाथेना, कार्यकर्ते, ‘सेव्ह आरे’