
अनिल देशमुख यांना नागपूर, दिल्ली जाण्यास परवानगी
मुंबई, ता. ६ : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नागपूर आणि नवी दिल्लीला जाण्याची परवानगी मुंबई विशेष न्यायालयाने सोमवार दिली. देशमुख सध्या जामिनावर मुक्त आहेत. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांच्या विरोधात ईडीने आणि सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही प्रकरणात त्यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे मुंबईबाहेर जाण्यासाठी त्यांना विशेष न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक होते. दोन्ही न्यायालयांनी सोमवारी त्यांना चार आठवड्यांसाठी नागपूर आणि नवी दिल्लीत जाण्याची परवानगी दिली. वरील प्रकरणात सीबीआय आणि ईडीने देशमुख यांच्यावर गंभीर आरोप ठेवले आहेत. बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे हा या प्रकरणात माफीचा साक्षीदार आहे; मात्र वाझेच्या जबाबावर न्यायालयाने जामीन निकालपत्रात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याप्रकरणातील अन्य आरोपींना जामीन मंजूर केला आहे.