चालण्यायोग्य पदपथांचा तपशील द्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चालण्यायोग्य पदपथांचा तपशील द्या!
चालण्यायोग्य पदपथांचा तपशील द्या!

चालण्यायोग्य पदपथांचा तपशील द्या!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : मुंबई शहर उपनगरात ज्येष्ठ नागरिकांसह अपंग आणि सर्वसामान्यांना चालण्यासाठी नक्की किती पदपथ उपलब्ध आहेत याचा तपशील दाखल करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. बोरिवलीमधील दोन दुकानदारांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर न्या. गौतम पटेल आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सोमवारी (ता. ६) सुनावणी झाली. याचिकादार पंकज आणि गोपाळकृष्ण अगरवाल यांनी त्यांच्या दुकानासमोर असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेचे न्यायालयाने जनहित याचिकेत रुपांतर केले आहे.

पदपथावर विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत न्यायालयाने विचारणा केली आहे. अशा फेरीवाल्यांना हटविल्यानंतर किती पदपथ मोकळे होतील आणि नागरिकांना चालण्यासाठी उपलब्ध होतील, असा प्रश्न खंडपीठाने केला आहे. तसेच पदपथ मोकळे करण्यासाठी येणाऱ्या अडचणींची माहितीही १ मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ असले तरी अनेक ठिकाणी त्यावर अतिक्रमण झाले आहे किंवा अनधिकृत बांधकाम केले आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि कारवाई करून पदपथ चालण्यासाठी उपलब्ध करायला हवे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. असे पदपथ ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना चालण्यायोग्य होतील यासाठी योजना आखण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. पेव्हर ब्लॉक आणि पार्किंगचा मुद्दाही खंडपीठाने उपस्थित केला. सर्व गोष्टी नियोजन पद्धतीने व्हायला हव्यात, असेही खंडपीठाने म्हटले. याचिकेवर पुढील सुनावणी ३ मार्चला होणार आहे.