
कोविड केंद्रामध्ये वैद्यकीय निष्काळजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : कोरोना कालावधीत बीकेसीमधील जम्बो कोविड केंद्रामध्ये वैद्यकीय निष्काळजी झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. याचिकेत ३६ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. अंधेरी येथील रहिवासी दीपक शहा (५४) यांनी ही याचिका केली आहे.
शहा यांची मार्च २०२१ मध्ये हर्नियाची (आंत्रगळ) शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेदरम्यान पोटात जाळी बसविण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर एप्रिल २०२१ मध्ये शाह यांना कोरोनाची लागण होऊन त्यांना बीकेसी जम्बो केंद्रात दाखल केले. शाह यांच्या कुटुंबीयांनी शस्त्रक्रियेची माहिती तेथील डॉक्टरांना देऊनही त्यांच्या पोटात दररोज चार ते पाच इंजेक्शन्स देण्यात आली. यामुळे शस्त्रक्रियेच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा दावा याचिकेतून केला आहे. या प्रकरणात वैद्यकीय चौकशी करण्याची आणि भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.