
पेटीएम बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड
मुंबई, ता. ७ ः पेटीएम पेमेंट बँकेतर्फे त्यांचे रुपे क्रेडिट कार्ड आता यूपीआय व्यवहारांशी संलग्न करण्यात आले आहे. यामुळे आता हे कार्ड यूपीआय व्यवहारांसाठी सर्वत्र वापरता येईल. यामुळे या कार्डाच्या व्यवहारांची व्याप्ती वाढेल.
हे कार्ड यूपीआयशी संलग्न करण्यासाठी पेटीएम बँकेने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी सहकार्य केले आहे. पेटीएममार्फत व्यवहार करणारे सर्वात जास्त छोटे व्यावसायिक भारतात आहेत. त्यामुळे आजच्या या घडामोडीचा फायदा ग्राहक आणि व्यावसायिक अशा दोघांनाही होईल. यासाठी ग्राहकांना त्यांचे रुपे क्रेडिट कार्ड यूपीआय आयडीबरोबर जोडून घ्यावे लागेल. त्यानंतर पेटीएम ॲपमार्फत क्यूआर कोड स्कॅन करून त्यांना व्यापाऱ्यांकडे हे कार्ड वापरता येईल. त्यामुळे त्यांना हे कार्ड प्रत्यक्ष बाजारात नेण्याचीही आवश्यकता भासणार नाही. या पद्धतीमुळे ऑफलाईन व ऑनलाईन अशी दोन्ही पेमेंट अत्यंत वेगात होतील अशी माहिती पेटीएम पेमेंट बँकेचे एमडी व सीईओ सुरिंदर चावला यांनी दिली. पेटीएम पेमेंट बँकेने डिसेंबर महिन्यापर्यंत यूपीआयमार्फत १७२ कोटी व्यवहार केले आहेत. या क्षेत्रातील व्यवहारांच्या संख्येत इतर बँकांपेक्षा पेटीएम बँकेचा क्रम सर्वात वरचा आहे.