मुंबईत ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी

मुंबईत ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : मुंबईत ‘जागरुक पालक-सुदृढ बालक’ हे विशेष अभियान उद्यापासून (ता. ९) राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून मुंबईतील ० ते १८ वयोगटातील २४ लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानाची नियोजन, अंमलबजावणी व नियमित आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका स्तरावर जिल्हा कृती दल स्थापन करण्यात आले, अशी माहिती उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांनी दिली आहे.

राज्यातील सर्व (ग्रामीण, शहरी व मनपा विभाग) ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गुरुवारपासून ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ विशेष अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने सदर अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

अभियानाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. ७) कृती दलाची सभा घेण्यात आली. यावेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य), कार्यकारी आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, भारतीय वैद्यकीय संघटनेचे सदस्य, इंडियन असोसिएशन ऑफ बालरोगतज्ज्ञ सदस्य आदी उपस्थित होते. अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वांनीप्रयत्न करावे, प्रत्येक बालकापर्यंत अभियानाचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी यावेळी दिले.
---
दिव्यांग शाळा व अंधशाळा, बालगृहे येथील मुला मुलींची तपासणी होणार!
अभियान अंतर्गत, मुंबई शहर व उपनगर विभागातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, दिव्यांग शाळा व अंधशाळा, अंगणवाड्या, बालगृहे/बालसुधारगृहे, अनाथालये, समाज कल्याण व आदिवासी विभाग, वसतिगृहे (मुले/मुली), खासगी नर्सरी, बालवाड्या, खासगी शाळा व खासगी कनिष्ठ महाविद्यालये, तसेच शाळाबाह्य विद्यार्थी अशा ० ते १८ वर्षांपर्यंतच्या साधारण २४ लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, असे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

अभियानात बालकांना व मुला-मुलींना समुपदेशन, उपचार व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय वैद्यकीय संघटना, इंडियन असोसिएशन ऑफ बालरोगतज्ज्ञ, खासगी डॉक्टर, अशासकीय संस्था यांनी या अभियानात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com