दहा मिनिट आधी पेपर देण्याची सवलत बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा मिनिट आधी पेपर देण्याची सवलत बंद
दहा मिनिट आधी पेपर देण्याची सवलत बंद

दहा मिनिट आधी पेपर देण्याची सवलत बंद

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी- बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिट आधी प्रश्नपत्रिका वाचण्यास देण्याची सवलत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात पेपरफुटीच्या तसेच प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमातून व्हायरल होतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

मंत्रालय येथे राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीला शिक्षण आयुक्त, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, विभागीय जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात राबवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना यापूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जात होती, ती सवलत आता रद्द केली जाणार आहे.

दुसरीकडे कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील महसूल, महिला व बालविकास, ग्रामविकास आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. सोबतच जिल्हाधिकारी आणि विशेष कार्यकारी अधिकारी आपापल्या विभागात पत्रकार परिषदा आयोजित करून कॉपीमुक्त अभियानासंदर्भातील माहिती सर्वसामान्य नागरिक आणि शाळा संस्थाचालकांना देणार आहेत. त्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

विद्यार्थ्यांची झाडाझडती
विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात अर्धा तासआधी १०.३० वाजता व दुपाराच्या सत्रात २.३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळित पार पडाव्यात यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची या कालावधीदरम्यान झाडाझडची घेतली जाणार आहे. मुलींची तपासणीही महिला शिक्षिका अथवा अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाईल. त्यासाठीची मदत महिला व बालविकास विभागाकडून घेतली जाणार आहे.

भरारी पथक नियुक्त
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर शिक्षण विभागाकडून नेमण्यात येणाऱ्या भरारी पथकांशिवाय जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे समन्वयातून भरारी पथके व बैठी पथके नियुक्त करण्यात येणार आहेत.

जीपीआरएस प्रणालीचा वापर
प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचण्याकरिता व उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमलेल्या सहाय्यक परिरक्षक (नर) यांना प्रवासादरम्यान जीपीआरएस प्रणाली लावली जाईल. त्याची सर्व माहिती मंडळाच्या विशिष्ठ यंत्रणेकडे ठेवली जाईल. तसेच पेपर ज्या कस्टडीमध्ये ठेवले जातील, त्याचे व्हिडीओ चित्रिकरणही केले जाणार आहे.

...तर पाच वर्षे परीक्षेपासून दूर
एखादा विद्यार्थी कॉपी प्रकरणात आढळल्यास त्याला दहावी-बारावीच्या परीक्षेपासून पाच वर्षे दूर ठेवले जाणार आहे. तसेच अधिक गंभीर प्रकरण असल्यास त्या विरोधात गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या शिक्षा दिल्या जातील यासाठीची शिक्षासूची नुकतीच जाहीर करण्यात आली. त्या शिक्षा सूचीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत दिली जाणार आहे.