
हिंमत असेल तर निवडणुका घ्या!
मुंबई, ता. १२ : हिंमत असेल तर सर्व निवडणुका एकत्र घ्या. आम्ही तयार आहोत, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. गोरेगाव येथील नाहर सिंह परिवाराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उत्तर भारतीय समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
‘सब ठीक बा?’ असे विचारत उद्धव ठाकरेंनी भोजपुरीमध्ये आपल्या भाषणाला सुरुवात केली. आजची ही केवळ बैठक आहे. मेळाव्याला मैदान कमी पडेल. मी बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आहे. सगळ्या भारतीयांना उत्तर हवे आहे. २५-३० वर्षे आम्ही युतीमध्ये राहिलो, काय मिळाले?
आज आम्ही उत्तर भारतीयांमध्ये आलो आहे. आम्ही या ठिकाणी तुमची साथ मागायला आलो आहोत, यात गैर काय, असा सवालही ठाकरे यांनी केला. हिंदू म्हणजे केवळ मराठी आहेत, असे बाळासाहेब कधीच म्हणाले नाही. मीही कधीच मराठी-अमराठी किंवा हिंदू- मुस्लिम असा भेद केला नाही, असेही ठाकरे म्हणाले.
---
ते केवळ भाकरी भाजतात!
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाच्याही घरात जाऊन भाकरी भाजतात. बोहरा समाजही आमच्यासोबत असल्याचे म्हणाले. मी तिथे गेलो असतो, तर मी हिंदुत्व सोडले असे म्हटले असते. ‘त्यांनी केले तर बडे दिलवाला, आम्ही केलं की हिंदुत्व सोडले’. आमचे हृदय मोठे नाही का, असा सवाल ठाकरे यांनी केला. आम्ही भेटलो तर राम-राम म्हणतो. तुम्ही भेटला की जय श्री राम म्हणता. म्हणजे राम आहेच. आपल्यासोबत मुस्लिम लोकही आहेत. आता एकजूट करण्याची गरज आहे. हिंमत असेल तर सर्व निवडणुका एकत्र घ्या. आम्ही तयार आहोत, असे म्हणत ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिले.