
लग्न जमविणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये लग्न जुळविणाऱ्या समन्वयकावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. समन्वयक या नात्याने चांगल्या हेतूने त्यांनी मुलीला स्थळ सुचविले होते. त्यामुळे त्यांनी केवळ समन्वयक म्हणून काम केले, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आणि गुन्हा रद्दबातल करण्याचे आदेश दिले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये बँक ऑफ इंडियामध्ये काम करणाऱ्या शैलेंद्र दुबे या कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज केला होता. त्यांनी मित्राच्या मुलीचा विवाह करण्यासाठी स्थळ सुचविले होते. गोव्यात थाटामाटात त्यांचा विवाह २०१८ मध्ये झाला होता; मात्र नंतर सासरची मंडळी आणि पतीने हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप करणारी तक्रार महिलेने दाखल केली आहे. यामध्ये सासरच्या मंडळींसह दुबे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात विविध कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. ही फिर्याद रद्दबातल करण्यासाठी दुबे यांनी याचिका केली होती.
न्यायालयाचे निरीक्षण
शैलेंद्र दुबे यांनी महिलेच्या वडिलांना सासरबद्दल खूप छान चित्र दाखवले होते; पण प्रत्यक्षात असे काही नाही, त्यामुळे ही फसवणूक आहे, असे आरोप दुबे यांच्यावर होते; मात्र खंडपीठाने हे आरोप अमान्य केले. दुबे यांनी स्वच्छ हेतूने मुलीला स्थळ सुचविले होते. यात त्यांनी समन्वयक म्हणून काम केल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवत गुन्हा रद्दबातल करण्याचे आदेश दिले आहेत.