
कैद्याच्या अवमानप्रकरणी अधिक्षकास समज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : आर्थर रोड कारागृहात बंदी असलेल्या आरोपीबरोबर गैरवर्तन केल्याबद्दल विशेष न्यायालयाने कारागृह अधिक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्याला कठोर ताकीद दिली आहे. अशाप्रकारचे वर्तन पुन्हा कारागृहात होता कामा नये, असे न्यायालयाने सुनावले आहे.
एका खंडणीच्या प्रकरणात आरोपी असलेला पण नंतर माफीचा साक्षीदार झालेल्या कैद्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयात साक्ष देण्यासाठी आल्यानंतर पुन्हा कारागृहात गेल्यावर त्याची तपासणी करताना पोलिस कर्मचाऱ्याने त्याला शिविगाळ केली आणि अन्य कैद्यांसमोर विवस्त्र केले होते. तसेच यापूर्वी जेव्हा त्याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला होता, तेव्हादेखील त्याची अन्य आरोपींसमोर मानहानी करण्यात आली. जेव्हा तो कारागृहातून न्यायालयात जायला निघतो तेव्हादेखील माफीचा साक्षीदार असूनही त्याला अन्य आरोपींबरोबर पाठवले जात होते, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे.
न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिस कर्मचाऱ्यांनी आणि अधीक्षकांनी यापुढे असे प्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी समज न्यायालयाने संबंधितांना दिली आहे. तसेच खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत; तर आरोपीकडे चिठ्ठ्या सापडल्या होत्या म्हणून ही झडती घेतली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले; मात्र न्यायालयाने याबाबत असमाधान व्यक्त केले आणि पुन्हा अशा घटना घडता कामा नयेत, अशी ताकीद कारागृह प्रशासनाला दिली आहे.