मुंबापुरीची हवा बिघडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबापुरीची हवा बिघडली
मुंबापुरीची हवा बिघडली

मुंबापुरीची हवा बिघडली

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : वाहनांची वाढती संख्या, बांधकाम प्रकल्पांतून उडणारी धूळ तसेच औद्योगिकीकरणामुळे मागील काही वर्षात मुंबईच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे. मुंबईतील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले असून जगातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स ‘आयक्यू एअर’च्या आकडेवारीतून पुढे आले आहे.
जगभरातील महत्त्वाच्या शहरांतील प्रदूषणाची स्थिती नोंदवण्यासाठी स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स ‘आयक्यू एअर’ने २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच २९ जानेवारीला सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दहाव्या स्थानावर होती; मात्र ८ फेब्रुवारीला मुंबई दुसऱ्या स्थानावर पोहोचली. १३ फेब्रुवारीला प्रदूषणाबाबत मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीलाही मागे टाकल्याचे स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्सच्या अहवालात समोर आले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील माहितीनुसार आयक्यू एअर, यूएनईपी आणि ग्रीनपीस यांनी मुंबईतील हवेची गुणवत्ता मोजली. तसेच, त्याचे यूएस हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार ‘निरोगी’, ‘अस्वास्थ्यकर’ आणि ‘धोकादायक’ असे वर्गीकरण केले. यानुसार, गेल्या तीन वर्षांच्या हिवाळ्याच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान मुंबईतील हवा ‘खराब’ आणि ‘खूप खराब’ असल्याचेही अहवालात नोंदवण्यात आले आहे.
---
वाढत्या प्रदूषणाची कारणे
१. वाहने, रस्ते आणि बांधकाम प्रकल्पांमधून सतत उडणारी धूळ आणि धूर यामुळे हवेची गुणवत्ता ढासळत आहे.
२. अरबी समुद्रातील ‘ला निना’च्या प्रभावाने पश्चिम किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग कमी झाल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.
३. नीरी आणि आयआयटीबीच्या २०२०च्या अभ्यासानुसार, मुंबईच्या हवेतील कणांच्या भारांपैकी ७१ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा रस्ते किंवा बांधकामांचा आहे. उर्वरित प्रदूषण औद्योगिक आणि ऊर्जा युनिट्स, विमानतळ आणि कचरा क्षेपणभूमीमधून होते.
............
सर्वात प्रदूषित शहरे
लाहोर (पाकिस्तान), मुंबई (भारत), काबूल (अफगाणिस्तान)