एसएडीटी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

एसएडीटी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

मुंबई, ता. १५ : श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) ७२ व्या दीक्षांत सोहळ्यात पदवी, पदविका आणि इतर अभ्यासक्रमांमधून ७२ विद्यार्थिनींनी विविध विषयांमध्ये प्रावीण्य मिळवत सुवर्णपदक पटकावले. ५३ जणींनी विविध विषयांत संशोधन करून पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली. चर्चगेटमधील लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृहात आज (ता. १५) सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोवा लोकायुक्त व माजी न्यायाधीश अंबादास जोशी व कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. रुबी ओझा, कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर, वित्त व लेखा अधिकारी विकास देसाई उपस्थित होते.
सोहळ्यात एकूण १२ हजार ८०१ स्वायत्त महाविद्यालयांसह विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. त्यात स्नातक पदवीचे पदवीधर तब्बल १० हजार ५२५ इतके होते. केवळ पदवीधर १ हजार ७७२ होते. पदविका ९७ , डिप्लोमा ४०२, प्रमाणपत्र ५ आणि ५३ पीएच.डी. प्रदान करण्यात आल्या. त्यातील एकूण ७२ विद्यार्थिनींना सुवर्णपदक, एक रौप्यपदक, एक ट्रॉफी व १३४ रोख बक्षिसे देण्यात आली. दीक्षांत सोहळ्यात डॉ. संजय शेडमाके, संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ यांनी बक्षिसे घोषित केली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अंबादास जोशी म्हणाले, की पदवीधर विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून देत असताना तरुण पिढीला कुटुंबात वाचन संस्कृती रुजवण्याची गरज आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाच्या पदवीधरांचे अभिनंदन करत महर्षी कर्वे यांच्या विचारांचा अंगीकार करावा, असे मत व्यक्त केले.

औषधनिर्माण शास्त्र या विषयात मी पीएच. डी. पूर्ण केली. आज त्याची पदवी मिळाली. ताम्हण या वृक्षाची फुले, फळे, त्याची साल, त्याची मुळे मधुमेह आदी रोगांवर खूप लाभदायक ठरत आहेत. मधुमेहासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही विषयांवर पेटंटचे प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. रोहिणी वाघमारे, एसएनडीटी विद्यापीठ

मी मानसशास्त्र विषय पीएच. डी.साठी निवडला होता. जीवनकौशल्य, त्यातील स्थ‍िती सापेक्षता, भावनिक बुद्ध्यांक, अपेक्षा आदी विषय‍ घेऊन त्यातील अनेक प्रकारांचे विश्लेषण केले.
- डॉ. अर्चना पत्की, मनीबेन एम. पी. शाह महिला विद्यापीठ

ग्रंथालयातील सुरक्षा आणि त्यांच्यासाठी असलेल्या प्लॅनवर मी राज्यातील विद्यापीठातील ग्रंथालयांवर संशोधन केले. त्यात ग्रंथालय सुरक्षा, त्यासाठीच्या विकासाच्या योजना आणि इतर नियोजनासाठीचा मोठा अभाव दिसून आला. सर्वच विद्यापीठांतील केलेल्या सर्वेक्षणात त्यासाठी असलेल्या अनेक त्रुटी सारख्याच दिसल्या.
- डॉ. वृषाली राणे, एसएनडीटी विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com