
अफगाणी बाळाच्या पारपत्रासाठी गृह मंत्रालयाला नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : एक वर्षाच्या निराधार अफगाणी बाळासाठी भारतीय पारपत्र मिळावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय गृह मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. पुण्यातील सामाजिक संस्था भारतीय समाज सेवा केंद्राच्या वतीने ही याचिका करण्यात आली आहे.
न्या. गौतम पटेल आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे नुकतीच याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांना या प्रकरणात मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित अफगाणी बाळाचा जन्म मागील वर्षी सप्टेंबरमध्ये झाला; मात्र जन्मानंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याला संस्थेकडे सुपूर्द केले आणि ते निघून गेले. सध्या तो लहान असून अद्याप दत्तक प्रक्रियेसाठी पात्र नाही. मात्र भविष्यात त्याच्यासाठी योग्य पालक मिळाले, तर त्याची दत्तक प्रक्रिया कागदपत्रांच्या अभावामुळे रखडू नये, या उद्देशाने न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. संबंधित बाळाचा जन्म भारतात झाल्यामुळे त्याला भारतीय पारपत्र मिळू शकते, आणि तशी अधिकृत कागदपत्रे देखील मिळू शकतात, असा दावा याचिकेत केला आहे. त्याच्या नागरिकत्वाचा मुद्दा यामध्ये अडसर ठरू नये, अशी विनंती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. सर्व विभागांनी सहकार्याच्या दृष्टीने यामध्ये सहभागी व्हायला हवे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.