भारताची राष्टीय  संस्कृतीची मुंबईकरांना भुरळ

भारताची राष्टीय  संस्कृतीची मुंबईकरांना भुरळ

भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीची मुंबईकरांना भुरळ
विविध राज्यांतील कलापरंपरेचा आझाद मैदानात संगम

भाग्यश्री भुवड, मुंबई
आपल्या देशाला फार प्राचीन आणि समृद्ध अशी संस्कृती आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेक सांस्कृतिक वारसा आजही जपला जातो. त्याचीच झलक सध्या आझाद मैदानात भरलेल्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवात पाहायला मिळत आहे. भारताच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या वेगवेगळ्या सजावटीच्या वस्तूंसह अनेक खाद्यपदार्थांची मेजवानी इथे अनुभवायला मिळत आहे.

नागालॅण्डचे शुष्क फूल, त्रिपुराची हातमाग कला, मिझोरममधील गवताची टोपली, विशेष प्रकारची चटई आणि हस्तकला अन् मेघालयातील ऊस व बांबूपासून बनवलेल्या वस्तूंचा पारंपरिक खजिना सध्या मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे. सिक्कीमची हस्तकला, आसामच्या वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार आणि त्रिपुराचा सांस्कृतिक पेहरावही आकर्षित करत आहे. निमित्त आहे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आझाद मैदानात भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे. महोत्सवात मांडण्यात आलेली भारताची कलापरंपरा अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. माणदेशी फाऊंडेशनचे अनेक स्टाॅल प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. केरळचे खाद्यपदार्थ, केळीपासून बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे चिवड्याचे प्रकार आणि इतर खाण्याचे पदार्थही इथे उपलब्ध आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्या सर्वांची माहितीही इथे प्रदर्शनात दिसते.
मी प्रदर्शनाला दोन वेळा भेट दिली. आपल्या भारताला आणि महाराष्ट्राला जी संस्कृती लाभली आहे त्याचा संपूर्ण अनुभव एकाच ठिकाणी घेता आला. त्यानिमित्ताने वेगवेगळे पदार्थांची चव आम्हाला घेता आली, असे ग्राहक वैशाली जगताप यांनी सांगितले. सून आणि मुलाच्या आग्रहाखातर कांदिवलीतील ७१ वर्षीय सुभद्रा बाबू हेमण यांनी आपल्या दोन्ही नातींसह महोत्सवाला भेट दिली. महोत्सवात आल्यानंतर पंढरपूरचे दर्शन घडल्याने मन प्रसन्न झाले. सर्व राज्यांची अनोखी संस्कृती इथे पाहायला मिळाली. आपल्या मुलांनाही त्याचा अनुभव घेता यावा म्हणून आम्ही इथे आलो, असे सुभद्रा हेमण यांनी सांगितले. 
हैदराबादचे मोत्यांचे कानातले आणि  तमिळनाडूचे भरतकाम, विशेष म्हणजे साड्यांचे खास आकर्षण इथे पाहायला मिळते. दोन हजारांपासून तब्बल २० हजारांपर्यंतच्या साड्यांचे दर आहेत. कर्नाटकमधील चेन्नापटना गावातील लाकडी खेळणी, लाखेच्या बांगड्या, लाकडी शिल्प, फायबर आणि ज्युटच्या पिशव्याही इथे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
११ फेब्रुवारीपासून  सुरू झालेल्या महोत्सवाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. महोत्सव १९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. रविवारी आणि शुक्रवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होती, असे विक्रेत्यांनी साांगितले. 

चार वर्षांपासून केरळमध्ये आमच्या आईने व्यवसाय सुरू केला. मुंबईकरांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. केळ्याचे वेफर्स, फणसाच्या पावडरपासून तयार केलेला हलवा, पापड आणि वेगवेगळे चिवड्यांचे प्रकार इथे मिळतात.
- कैलाश नंदन,  सुप्रिया फुड्स,  केरळ

आम्ही सांस्कृतिक पेहराव करून आलो आहोत. आमच्याकडे पूजा किंवा कोणत्याही सणाला सांस्कृतिक पेहराव केला जातो. आम्ही रिशा (शालीसारखा एक प्रकार) देऊन येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतो. त्याला इथेही मागणी आहे.
- पंचाली देबवर्मा, त्रिपुरा

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या वतीने पंढरपूरच्या वारीचे दर्शन इथे अनुभवायला मिळते. ज्यांना कधीही वारी पाहायला मिळत नाही त्यांना त्याचा अनुभव इथे घेता येतो. पूर्णपणे अभ्यास करून प्रदर्शन भरवण्यात आले आहे.  पुढील वर्षी युनेस्कोमध्ये प्रदर्शन भरवले जाईल.
- सुमित डे, अधिकारी, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com