विशेष सैनिकांच्‍या चित्र प्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष सैनिकांच्‍या चित्र प्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
विशेष सैनिकांच्‍या चित्र प्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

विशेष सैनिकांच्‍या चित्र प्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

विशेष सैनिकांच्‍या चित्र प्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
युद्धामध्ये हात, पाय गमावलेल्यांनी ब्रश तोंडात धरून साकारल्‍या कलाकृती
मुंबई, ता. १८ ः देशासाठी युद्धामध्ये प्राणपणाने लढताना हात आणि पाय गमावलेल्या सैनिकांनी ब्रश तोंडात धरून कलाकृती साकारल्‍या आहेत. त्‍यांच्‍या या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत सुरू असून ते २० फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
या प्रदर्शनात युद्धात हात आणि पाय गमावलेल्या प्रशांत वसंत कांबळे, मृदुल घोष, सुदाम बिसोई, शंकर श्रीराम लाखे, भीमकुमार कारकी, धनकुमार लामा या सैनिकांनी ब्रश तोंडात धरून काढलेल्या चित्रांचा समावेश आहे. त्यांनी ही चित्रे कॅनव्हासवर अक्रीलिक, फ्लोरोसेंट व जलरंग वापरुन साकारली असून त्यात वास्तववादी आणि निम्न वास्तववादी तसेच अमूर्त शैलीतील विविधांगी व वैशिट्यपूर्ण अशा ७५ कलाकृतींचा समावेश आहे.
रोटरी इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट, मुंबई, ठाणे, पुणे, पनवेल या डिस्ट्रिक्टमधील १८ क्लब यांनी एकत्र येऊन या कलाकारांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनातील चित्रे विक्रीसाठी ठेवली असून त्यातील काही चित्रे रोटरी क्लबच्या सदस्यांनी राखून ठेवली आहेत. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. अनिल परमार, संदीप अगरवाल आणि कैलास जेठानी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्नल डॉ. रतन मुखर्जी, पीडीजी रश्मी कुलकर्णी आणि डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन कल्पना मुंशी यांच्या सहाय्याने हा प्रकल्प चालू केलेला आहे. या प्रदर्शनात स्वस्तिक एंटरप्राइजचे रोटरीयन निलेश दहिफुले यांचे मोलाचे सहकार्य या उपक्रमास लाभले आहे. आपले हात आणि पाय नाहीत हे दु:ख विसरून, हार न मानता आलेल्या परिस्थितीशी झगडून सैनिकांनी ब्रश तोंडात धरून काढलेल्या या विलोभनीय आणि मनोवेधक कलाकृती सर्व कलाप्रेमींना आकर्षित करत आहेत.
पुण्यात खडकी येथे पारपलेगिक रिहॅबिलिटेशन सेंटर ही संस्था अनेक वर्षे कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून युद्धामध्ये हात अथवा पाय गमावलेल्या सैनिकांचे पुनर्वसन येथे केले जाते. नियमित व्यायाम आणि विविध खेळांच्या बरोबरीने या सैनिकांच्या अंगात असलेले कलागुणही इथे जोपासले जातात. यामध्ये हे सहा सैनिकी अधिकारी असे आहेत की जे उत्तम पेंटिंग करू शकतात. मात्र ब्रश हातात घरून नव्हे तर ब्रश चक्क तोंडात धरून चित्र रेखाटतात. या चित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लबच्या सहाय्याने दिग्गज कलाकारांचे वर्कशॉप आयोजित केले होते. त्यात चित्रकार वासुदेव कामत सरांसारखे ज्येष्ठ चित्रकारांनी मार्गदर्शन केले होते.