अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : मानधनात वाढ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने नाराज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आजपासून (ता. २०) बेमुदत संप पुकारला आहे. नियमाप्रमाणे पंधरा दिवसांपूर्वी संपाची नोटीस बजावून कर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केली. दरम्यान, संपकाळात शासनाला मदत करणार नसल्याचा इशाराही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीकडून देण्यात आला आहे. तसेच मागण्या मान्य होईपर्यंत संप करण्याचा निर्धार करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
सध्या सरकारची दडपशाही सुरू असून अंगणवाडी सेविकांनी संपात सहभागी असल्याचे हस्तलिखित पत्र प्रकल्प कार्यालयाला द्यावे, अशी विचित्र अट मांडली जात आहे; मात्र कायद्याप्रमाणे आम्ही संपाची नोटीस पंधरा दिवसांपूर्वीच दिली आहे. त्यामुळे संपकाळात सरकारला कोणतीही मदत करणार नाही. तसेच जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तो पर्यंत आम्ही संप मागे घेणार नसल्याचा निर्धार असल्याचे कृती समितीचे समन्वय राजेश सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, येत्या २८ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला सुरुवात होईल. नोटीस बजावून देखील सरकारने दुर्लक्ष करत कृती समितीला बोलण्यास पाचारण केले नसल्याने संपाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कृती समिती कडून सांगण्यात आले.
---
यंत्रणा कोलमडणार?
अंगणवाडी कर्मचारी संपावर गेल्यावर राज्यात कुपोषण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ३ ते ६ वयोगटातील मुलांना शिक्षण आणि आहार मिळणार नाही. शिवाय एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाला मुलांची माहिती मिळणे कठीण होईल, अशी शक्यता या निवेदनात वर्तवली आहे.