बार्टीत ‘वारे’ न वाहता गजभियेंची ‘ज्योत’ राहणार कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बार्टीत ‘वारे’ न वाहता 
गजभियेंची ‘ज्योत’ राहणार कायम
बार्टीत ‘वारे’ न वाहता गजभियेंची ‘ज्योत’ राहणार कायम

बार्टीत ‘वारे’ न वाहता गजभियेंची ‘ज्योत’ राहणार कायम

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशासन संस्थेच्या (बार्टी) महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये हे कायम राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्याविरोधात आलेली याचिका आज निकाली काढली.
सामाजिक न्याय विभागाने २४ जानेवारीला वरिष्ठ अधिकारी सुनील वारे यांची बार्टीच्या महासंचालकपदी नियुक्ती केली होती, तर विद्यमान महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्या पदावरून बाजूला केले होते. या निर्णयाविरोधात गजभिये यांनी २७ जानेवारीला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये (मॅट) आव्हान दिले होते. मॅटने वारे यांची नियुक्ती रोखून धरत गजभिये यांच्या बाजूने अंतरिम निकाल दिला होता. वारे यांनी मॅटच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यात वारे यांची याचिका निकाली काढली. वारे यांच्या बाजूने न्यायालयात ॲड. अभिजित देसाई यांनी, तर गजभिये यांच्या बाजूने ॲड. प्रज्ञा तळेकर, माधुरी अय्यपन यांनी बाजू मांडली होती.
--
मोर्चात विषय गाजणार
दरम्यान, बुधवारी (ता. २२) मुंबईत मांग-मातंग समाजाचा महामोर्चा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वारे यांची याचिका निकाली काढल्याने आंदोलनात बार्टी विरोधातील रोष व्यक्त होण्याची शक्यता आहे. तसेच या मोर्चात बार्टीचे विभाजन करून मांग मातंग समाजासाठी आर्टी नावाची वेगळी संस्था स्थापन करण्याची प्रमुख मागणी केली जात आहे.