प्रख्यात नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रख्यात नृत्यांगना 
डॉ. कनक रेळे यांचे निधन
प्रख्यात नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन

प्रख्यात नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : प्रख्यात नृत्यांगना, शास्त्रीय नृत्याच्या अभ्यासक आणि नालंदा नृत्य संशोधन केंद्राच्या संस्थापिका डॉ. कनक रेळे (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने आज विलेपार्ले येथील केएलएस रुग्णालयात निधन झाले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
मोहिनीअट्टम या नृत्य प्रकारात पारंगत असलेल्या डॉ. रेळे यांनी नृत्यशास्त्राच्या अध्ययनासाठी स्वतंत्र महाविद्यालय असावे, या ध्यासाने प्रेरित होऊन १९६६ साली नालंदा नृत्य संशोधन केंद्राची स्थापना केली. त्यानंतर सन १९७३ मध्ये नालंदा नृत्यकला महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर त्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी नृत्यशास्त्राचे धडे दिले. त्यांचे हजारो विद्यार्थी आज देशात, परदेशात कार्यरत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत त्या अध्यापनात कार्यरत होत्या. त्यांच्यामागे पती, मुलगा, सून, नातू आणि विवाहित नात असा परिवार आहे.
---
डॉ. कनक रेळे यांनी आपले जीवन भारतीय शास्त्रीय नृत्याच्या प्रचार, प्रसार व संशोधनासाठी समर्पित केले. मोहिनीअट्टम तसेच कथकली नृत्य प्रकारात त्या विशेष पारंगत होत्या. ‘नालंदा नृत्य आणि संशोधन केंद्र’ आणि ‘नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य घडविले. त्यांच्या निधनामुळे शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील एका महान नृत्य तपस्विनीला गमाविले आहे.
- रमेश बैस, राज्यपाल
---
मोहिनीअट्टम आणि कथकली या नृत्य प्रकारात पारंगत असलेल्या डॉ. कनक रेळे या नृत्य गुरू म्हणूनच परिचित होत्या. आपले संपूर्ण जीवन भारतीय शास्त्रीय नृत्याच्या प्रचार, प्रसार, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी त्यांनी वेचले. भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार सामान्य जनतेतही लोकप्रिय करण्यात त्यांच्या ‘नालंदा नृत्य आणि संशोधन केंद्र’ आणि ‘नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्थांच्या कार्याचा मोठा वाटा आहे.
- सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री.