
आपला रोल मॉडेल ठरवा : डॉ. मनीषा कायंदे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : आपला रोल मॉडेल कोण आहे ते ठरवा, त्याच्याविषयीची माहिती जमवा आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच यश मिळेल, असा विश्वास विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केला. आज त्यांनी यिनच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर त्याबाबतची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी अवांतर वाचन महत्त्वाचे आहे. पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. पुस्तक वाचन हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग असायला हवा, असेही त्या म्हणाल्या. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुषमा स्वराज या माझ्या रोल मॉडेल आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीने मी प्रभावित झाले, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा, संसद यातील महिलांचे प्रतिनिधित्व वाढायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यिनच्या मुलींमध्ये ही कुवत असून कदाचित त्यातीलच एक महिला प्रतिनिधी उद्याची महाराष्ट्राची मुख्यमंत्री बनू शकते, असे कौतुकोद्गार त्यांनी या वेळी काढले.