
राज्य शिक्षक पुरस्काराचे आज वितरण
मुंबई, ता. २३ : शालेय शिक्षण विभागाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केलेल्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान सोहळा उद्या (ता. २४) फेब्रुवारी होणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक लाख दहा हजार रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
समाजाची निःस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार दिला जातो. पुरस्कारविजेत्या शिक्षकांमध्ये प्राथमिक (३८), माध्यमिक (३९), आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक प्राथमिक (१८), थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार (८), विशेष शिक्षक कला / क्रीडा (२), दिव्यांग शिक्षक, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक (१), स्काऊट-गाईड (२) अशा एकूण १०८ शिक्षकांचा सपत्निक सत्कार केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री, आमदार कपिल पाटील, भाजप नेते व माजी शालेय शिक्षण मंत्री अॅड. आशीष शेलार, शालेय शिक्षण सचिव रनजितसिंग देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक कैलास पगारे, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक संचालक कृष्णकुमार पाटील आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली.