
गोयल दाम्पत्याविरोधातील ‘ईडी’चा तपास अहवाल रद्द
मुंबई, ता. २३ : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दाखल केलेला तपास अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज रद्दबातल केला. यामुळे गोयल यांना दिलासा मिळाला आहे.
एका ट्रॅव्हल कंपनीने गोयल पती-पत्नीच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे फौजदारी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सन २०२० मध्ये क्लोजर अहवाल सादर करून गोयल पती-पत्नीला क्लीन चीट दिली. ईडीने पोलिसांच्या तक्रारीवरून गोयल यांच्याविरोधात तपास अहवाल सादर केला होता; मात्र पोलिसांनी क्लोजर अहवाल दाखल केला, तरी ईडीने त्यांचा ‘ईसीआयआर’ रद्दबातल केला नव्हता. या विरोधात गोयल पती-पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली.
ईडीच्या वतीने ॲड. श्रीराम शिरसाठ यांनी बाजू मांडली. पोलिसांनी क्लोजर अहवाल दाखल केल्यानंतर ईसीआयआरला आधार राहत नाही, असे ईडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच भविष्यात एखादी तक्रार आल्यावर याबाबत ईडीने अन्य तपास यंत्रणांना पत्र लिहिले आहे, असेदेखील यावेळी सांगण्यात आले; मात्र भविष्यात होणाऱ्या प्रकरणावर सध्या बोलणे योग्य नाही. तूर्तास हा अहवाल रद्दबातल करत आहोत, असे खंडपीठाने सुनावले आणि गोयल यांची याचिका मंजूर केली. अकबर ट्रॅव्हलने केलेली तक्रार देखील निकाली निघाली आहे, अशी माहिती गोयल यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ रवी कदम यांनी दिली.