
मुंबईतील ६ गोवर केंद्र बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईतील गोवर संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील ६ गोवर केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र उद्रेक असलेल्या प्रभागात लक्ष असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार सर्वेक्षण, तपासणी आणि लसीकरण पालिकेतर्फे करण्यात येत आहे.
बंद केलेल्या गोवर केंद्रांत ‘सी’ प्रभागामधील पांजरपोळ आरोग्य केंद्र, ‘एच पूर्व’मधील शांतीनगर आरोग्य केंद्र, ‘के पूर्व’मधील सर्वोदय नगर आरोग्य केंद्र, ‘पी उत्तर’मधील आप्पा पाडा आरोग्य केंद्र, ‘एल’मधील हिमालया आरोग्य केंद्र; तर ‘एल’ प्रभागातील नेहरु नगर आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. गोवर मृत्यू संशोधन समितीच्या म्हणण्यानुसार पालिका क्षेत्रात २०२२ या वर्षात गोवरने ११; तर २०२३ या वर्षात ४ मृत्यू झाले आहेत.
गोवर उद्रेक असलेले प्रभाग
मुंबई शहर - ए, सी, ई, डी, एफ दक्षिण, एफ उत्तर, जी उत्तर, जी दक्षिण
पश्चिम उपनगर - एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण
पूर्व उपनगर - एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन आणि एस