
‘आपला दवाखाना’चे चार लाख लाभार्थी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रमातील लाभार्थी संख्येने ३ फेब्रुवारी २०२३ रोजी तीन लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर २२ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे अवघ्या १९ दिवसांत यामध्ये एक लाख रुग्णांची भर पडून लाभार्थ्यांची संख्या चार लाख ५ हजार ४२६ इतकी झाली आहे. मुंबईत आजघडीला १०७ ठिकाणी हे दवाखाने कार्यरत आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या (१७ नोव्हेंबर २०२२) पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा विस्तार करण्यात येत आहे.
‘आपला दवाखाना’ यामधून ३,८९,८३३ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचाराचा लाभ घेतला आहे; तर पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र येथे १५ हजार ५९३ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्री-रोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतला आहे.
रुग्ण संख्येचा टप्पा
रुग्ण संख्या दिनांक
१ लाख ३० नोव्हेंबर २०२२
२ लाख ७ जानेवारी २०२३
३ लाख ३ फेब्रुवारी २०२३
४ लाख २२ फेब्रुवारी २०२३
धारावीत १७ आरोग्य केंद्रे
महापालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागात धारावीचा समावेश होतो. धारावीसारख्या झोपडपट्टीबहुल, घनदाट लोकसंख्येच्या परिसरात कोविडचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. या भागातील आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेऊन नागरिकांना सुविधा देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार पालिकेने याठिकाणी १५ आपला दवाखाने आणि २ डायग्नोस्टिक केंद्र अशा १७ ठिकाणांहून आरोग्य सेवा पुरवली जात आहे. या १७ दवाखान्यांमधील लाभार्थ्यांची संख्या तब्बल १,०४,७४६ इतकी झाली आहे.
या सेवांचा लाभ
‘आपला दवाखाना’ योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. एक्स-रे, सोनोग्राफी आदी चाचण्यांकरिता पॅनेलवरील डायग्नोस्टिक केंद्रांद्वारे पालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवाही पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
‘आपला दवाखाना’मधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे व टॅब आधारित पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण, तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधांचा तपशील नोंदविण्यात येत आहे. यामुळे ‘आपला दवाखाना’चे कामकाज पेपरलेस पद्धतीने व पर्यायाने पर्यावरणपूरक होत आहे.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी