गुणवत्तापूर्ण पिढीत शिक्षकांचा वाटा मोलाचा

गुणवत्तापूर्ण पिढीत शिक्षकांचा वाटा मोलाचा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : विविध क्षेत्रांतील गुणवत्तेत महाराष्ट्र राज्य देशामध्ये अग्रस्थानी आहे. यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. भारतातील याच गुणवत्तेच्या आधारे आपला देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या २०२१-२२ च्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण कौशल्य विकासमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन करताना मंत्री केसरकर बोलत होते.

शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. २०२१-२२ या वर्षीच्या १०८ पुरस्कार विजेत्या शिक्षकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र यासह पुरस्काराची रक्कम १० हजार रुपये, तसेच राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिले जाणारे एक लाख रुपये असे एकत्रित एक लाख दहा हजार रुपये पुरस्कार स्वरूपात प्रदान करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या दिशादर्शिकेच्या ‘मंथली टेबल प्लॅनर’चे अनावरण करण्यात आले. या वेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, आमदार कपिल पाटील, संचालक (योजना) महेश पालकर, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्यासह पुरस्कार विजेते शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

ग्रामपंचायत स्तरावर आदर्श महिलांचा सन्मान
शिक्षकांकडे उच्च गुणवत्ता असून ते निस्वार्थी भावनेने नवीन पिढी घडविण्याचे काम करतात. अशा आदर्श शिक्षकांचा सन्मान करणे, हा सरकारचा बहुमान असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या वेळी सांगितले. राज्याच्या महिला धोरणांतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दोन आदर्श महिलांचा सन्मान करण्यात येणार असून त्यातील किमान एक महिला शिक्षक असेल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com