मलिकांच्या जामिनावर तातडीने सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलिकांच्या जामिनावर तातडीने सुनावणी
मलिकांच्या जामिनावर तातडीने सुनावणी

मलिकांच्या जामिनावर तातडीने सुनावणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे गुणवत्तेच्या निकषावर त्यांच्या जामिनावर तातडीने सुनावणी घेण्यात येईल, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून, कुर्ल्यामधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी नियमित जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

न्या. एम. एस. कर्णिक यांच्यापुढे जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. नवाब मलिक पीएमएलए कायद्याच्या तरतुदींनुसार आजारी व्यक्ती होऊ शकतात का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. यावर ॲड. अमित देसाई यांनी त्यांची बाजू मांडली. मलिक एक वर्षापासून कारागृहात आहेत आणि त्यांची एक किडनी सध्या निकामी; तर दुसरी किडनी कमकुवत होत आहे. याबाबत वैद्यकीय चाचणी करण्यासाठी न्यायालयात दोन-तीन आठवडे जातात. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिक खालावत आहे, अशा परिस्थितीत आरोपीला कायदेशीर पद्धतीने जामीन मंजूर होऊ शकतो, असा युक्तिवाद त्यांनी केला.

आता त्यांची चौकशी सुरू नाही आणि ते खटल्यात हजेरी लावू शकतात; मग त्यांच्या उपचारांवर सरकारी मार्गाने खर्च कशाला करायला हवा, त्यापेक्षा त्या जागी दुसरा गरजू रुग्ण उपचार घेऊ शकतो. जर ते स्वखर्चात यावर उपचार करून घेऊ शकतात, तर सरकारवर भार कशाला, असा दावाही ॲड. देसाई यांनी केला. न्यायालयाने याबाबत सहमती व्यक्त केली असून मलिक यांची प्रकृती गंभीर आहे, असे मान्य केले आहे. तसेच पुढील मंगळवारपासून (ता. २८) जामिनावर सुनावणी घेण्यात येईल, असेही निर्देश दिले.