यु-डायवसवरील नोंदणी रेंगाळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यु-डायवसवरील नोंदणी रेंगाळली
यु-डायवसवरील नोंदणी रेंगाळली

यु-डायवसवरील नोंदणी रेंगाळली

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : राज्यातील शाळांनी आपल्याकडे असलेली विद्यार्थी, शिक्षक इत्यादींची सर्व प्रकारची माहिती ‘यू-डायस’वर भरावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते, पण राज्यातील एकूण शाळांपैकी केवळ ३२ टक्के शाळांनीच यू-डायसवर १५ फेब्रुवारीपर्यंत नोंद केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळांच्या दिरंगाईवर हरकत घेत नव्याने यू-डायसवरील नोंदणीचे आदेश जारी केले आहेत.

यू-डायसच्या माध्यमातून दरवर्षी पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती नोंदवली जाते. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, विद्यार्थी संख्या, पायाभूत सुविधांची माहिती, विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सोई-सुविधा, शिक्षकसंख्या आणि पदे, रिक्त पदे आदी माहिती या माध्यमातून दरवर्षी एकत्रित केली जाते. यासाठी केंद्र सरकारच्यावतीने यू-डायस प्लस ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मागील काही वर्षांत ही प्रणाली व्यवस्थित चालावी म्हणून त्यात अनेक प्रकारचे बदलही करण्यात आले आहेत. मागील वर्षात राज्यातील सर्व शाळांची माहिती यू-डायसच्या माध्यमातून भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत केवळ ३२ टक्केच शाळांनी आपली नोंदणी पूर्ण केली असल्याने राज्यात प्रवेशित विद्यार्थी, त्यांची पटसंख्या यांचा मोठा गोंधळ समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे शिक्षक आणि संस्थाचालकांनी यावर चालढकल करत आमच्याकडे सरल पोर्टलची माहिती भरणे, आधार कार्ड अपडेट करणे अशी कामेही देण्यात आली आहेत, त्यामुळे आमचा खूप वेळ त्यात जात असल्याचा दावा केला आहे.