
शेअर बाजारात सलग सातवी घसरण
मुंबई, ता. २७ : जागतिक परिस्थितीच्या रेट्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात सलग सातवी घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्स १७५.५८ अंश, तर निफ्टी ७३.१० अंशांनी घसरला.
अमेरिकेतील नागरिकांची मागणी, तसेच वस्तूंचा खप वाढल्याची आकडेवारी समोर आल्यामुळे चलनवाढीला आळा घालण्यासाठी अमेरिकी फेडरल बँक व्याजदर वाढवेल, अशी भीती बाजारात पसरली. त्यामुळे आज जगभरातील जवळपास सर्व शेअर बाजारांत चढ-उतार पाहायला मिळाले. त्यामुळे आज भारतीय शेअर बाजारही सकाळपासूनच मंदीच्या वातावरणात होते. नंतर घसरण वाढतच गेली, पण दुपारी त्यात थोडी सुधारणा झाली, मात्र बाजाराचा कल नकारात्मकच होता. दिवसअखेरीस सेन्सेक्स ५९,२८८.३५ अंशांवर, निफ्टी १७,३९२.७० अंशांवर स्थिरावला.
आज वाहन निर्मिती, तसेच धातू निर्मिती क्षेत्र आणि कॅपिटल गुड्स या क्षेत्रांच्या शेअरमध्ये विक्री झाली; तर बँका आणि अर्थसंस्थांच्या शेअरमध्ये खरेदी झाल्यामुळे तोटा बऱ्यापैकी मर्यादित राहिला. व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर दोन तासांनी सेन्सेक्स एकोणसाठ हजारांच्याही खाली गेला होता. मात्र तेथून तो कसाबसा सावरला, आज दिवसभरात सेन्सेक्स साठ हजारांच्या जवळपासही जाऊ शकला नाही.
आज निफ्टीमधील अदाणी एंटरप्राइजेस पावणेदहा टक्के घसरून १,१८७ रुपयांवर स्थिरावला. बजाज ऑटो पाच टक्क्यांहूनही जास्त, तर यूपीएल चार टक्क्यांहूनही जास्त घसरला. टाटा स्टील, इन्फोसिस हे शेअरही तीन टक्क्यांच्या आसपास घसरले; तर निफ्टीमधील आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एचडीएफसी लाईफ, स्टेट बँक हे शेअर एक ते दोन टक्का वाढले. सेन्सेक्समधील टाटा मोटर्स, टीसीएस दोन टक्के घसरले, महिंद्र आणि महिंद्र, एचसीएल टेक, लार्सन अँड टुब्रो एक ते दोन टक्क्यांच्या आसपास घसरले.
कोट
...........
अमेरिकी आर्थिक परिस्थितीमुळे व्याज दरवाढ शक्य असल्याच्या चिंतेमुळे आज भारतीय शेअर बाजारात पुन्हा मंदीचे वर्चस्व असल्याचे दिसून आले.
- विनोद नायर, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस.