विवा समूहाचे मेहुल ठाकूर यांना जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवा समूहाचे मेहुल ठाकूर यांना जामीन मंजूर
विवा समूहाचे मेहुल ठाकूर यांना जामीन मंजूर

विवा समूहाचे मेहुल ठाकूर यांना जामीन मंजूर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २८ : मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेल्या विवा समूहाचे संचालक मेहुल ठाकूर यांना विशेष न्यायालयाने मानसिक आजाराच्या कारणांमुळे मंगळवारी नियमित जामीन मंजूर केला. वसईमधील विवा समूहाचे ठाकूर यांना ईडीने २०२१ मध्ये अटक केली होती. मागील वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने मानसिक आरोग्याच्या कारणावरून त्यांना ११ महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर केला होता. हा जामीन नियमित करण्यासाठी त्यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला होता.

विशेष न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांच्यापुढे याचिकेवर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने ठाकूर यांच्या मानसिक आजाराची दखल घेऊन त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे; जर पुन्हा त्यांना कारागृहात आणले, तर त्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएमएलए कायद्याच्या कलम ४५ अ नुसार त्यांना जामीन मंजूर होऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. जरी सध्या ते वैद्यकीय जामिनावर असले आणि रुग्णालयात उपचार घेत असले, तरी त्यांचा वैद्यकीय अहवाल असमाधानकारक आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसून, हा कायमस्वरूपी मानसिक आजार म्हणून बळावत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अहवालात आहे, असा उल्लेख न्यायालयाने केला आहे.

ठाकूर यांच्यासाठी कारागृहात मानसिक समुपदेशनदेखील उपलब्ध नाही. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्यावर सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे आणि कारागृहात हे अशक्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

काय आहे प्रकरण?
विकसक राकेश आणि सारंग वाधवान यांनी येस बँकेतून हजारो कोटी रुपयांचे कर्ज मैक स्टार मार्केटिंग कंपनीला दिले. ज्यामधील मोठी रक्कम वाधवान यांच्या निकटवर्तीय कंपन्यांना मिळाली. तसेच विवामध्येदेखील सुमारे १९६ कोटी रुपयांची रक्कम वळविण्यात आली, असा आरोप ईडीने केला आहे. याबाबत ईडीचा तपास अद्याप सुरू आहे.