
शिकागोमध्ये रंगली काव्यमैफल
शिकागोमध्ये रंगली काव्यमैफल
रामदास फुटाणे, महेश केळुसकर यांच्या कवितेने केले मंत्रमुग्ध
मुंबई, ता. १ : मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर शिकागो येथील महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या ‘मराठी असे आमुची मायबोली’ या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, कवी महेश केळुसकर, प्रशांत मोरे आणि कवी भारत दौंडकर यांच्या विविध विषयावरील कवितांनी उपस्थित प्रेक्षक आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले.
महाराष्ट्र मंडळ शिकागोने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, कवी महेश केळुस्कर, प्रशांत मोरे आणि कवी भारत दौंडकर हे भारतातून ऑनलाईन सहभागी झाले होते; तर अमेरिकेतील विविध राज्यात असलेले मराठी बांधव, साहित्यिक, कवी यात सहभागी झाले होते. मराठी भाषा दिनाच्या या कार्यक्रमाचे आयोजक माधव गोगावले यांच्यासह काहींनी मराठी पारंपरिक पेहराव, पगडी, फेटे; तर महिला पैठणी साडी, नथ घालून नटून सजून आल्या होत्या. या कार्यक्रमाचे संचालन अमेरिकेतून माधव गोगावले, प्रसाद अथणीकर, श्रद्धा भट, समीर कुलकर्णी व अश्विनी कुंटे यांनी केले होते.
कोकणातील खेडेगावातील वास्तव महेश केळुस्कर यांनी ‘हातात हात घेतला झालो झिंनझिंनाट’ या कवितेतून मांडले. त्यांनी ही कविता ३२ वर्षांपूर्वी केली होती. ती हजारो वेळा वाचली गेली असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. ते म्हणाले की, मराठीतील सर्वेक्षणानुसार मराठीच्या ३८ बोलीभाषा आहेत. या मराठी प्रमाणभाषेच्या रक्तवाहिन्या आहेत. त्यामुळे या बोलीभाषेतून खूप मोठ्या प्रमाणात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होत असतो, त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मालवणी बोलीतील ही कविता म्हणून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले. तसेच ‘पुढे पुढे दिवस आणखी कठीण जातील’ ही कविता सादर केली.
रामदास फुटाणे यांनी मानवी जीवन अथवा इतर प्राण्यांमधील दोन जातीत सृष्टीकर्त्याने निर्माण केलेले समान सूत्र स्पष्ट केले. मातीवर प्रेम करणारी माणसे कधीही देशाशी बेमानी करत नाहीत, असे सांगत त्यांनी किंगफिशरवर केलेली कविता म्हणून दाखवली. यासोबत मुक्त अर्थव्यवस्थेसंदर्भातील कविताही रामदास फुटाणे यांनी म्हटली. तसेच स्त्रीवरील विनोदी कविता म्हणून दाखवली. तशीच कविता पुरुषांवर केली, त्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याच्या उकळ्या फुटल्या. भारत दौंडकर यांच्या कवितेने ग्रामीण भागातील वास्तव नजरेसमोर उभे केले. त्यांची ‘गोफ’ नावाची कविता उपस्थितांना खूप आवडली. कवी प्रशांत मोरे यांनी स्त्रियांचे दुःख मांडणारे ग्रामीण भागातील तिचे जीवन स्पष्ट करणारी कविता यावेळी सादर केली.
दरम्यान, मराठी भाषा व मराठी संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र मंडळ शिकागो दर आठवड्यात असे कार्यक्रम आयोजित करत असते. मात्र, या वेळी मराठी भाषा गौरव दिनाचा हा मोठा कार्यक्रम जगभरात पोहचला असल्याचे आयोजक माधव गोगावले यांनी सांगितले.