
डिफॉल्ट जामिनावर खुलासा करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात आरोपी असलेल्या चौघांच्या डिफॉल्ट जामिनावर खुलासा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एनआयएला दिले आहेत. आरोपी महेश राऊत यांच्यासह सुधीर ढवळे, सोमा सेन आणि रोना विल्सन यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.
हिंसाचार प्रकरणात या सर्व आरोपींना जून २०१८ मध्ये पुणे पोलिसांनी अटक केली होती. यात ऑगस्ट २०१८ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज संमत करण्यात आला. संबंधित न्यायालय विशेष न्यायालयाच्या क्षेत्रात नव्हते. त्यामुळे ते अशी मुदतवाढ देऊ शकत नाही, असा आरोप चारही जणांनी जामीन अर्जात केला आहे. अशा प्रकारे परिस्थिती असलेल्या आरोपी सुधा भारद्वाज यांना न्यायालयाने यापूर्वी सशर्त जामीन मंजूर केला आहे. हाच निकष लावून आम्हाला जामीन मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी पुणे आणि उच्च न्यायालयाने अशा प्रकारचा अर्ज फेटाळला आहे. फौजदारी दंडसंहिता कलम १६७ (२) नुसार अशा परिस्थितीत जामीन मंजूर केला जाऊ शकतो, असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला. दरम्यान आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी उच्च न्यायालयात स्वतः बाजू मांडण्यासाठी अर्ज केला आहे. यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गडलिंग यांनीदेखील डिफॉल्ट जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. यापूर्वी न्यायालयाने केवळ भारद्वाज यांना डिफॉल्ट जामीन मंजूर केला आहे.