साडेतीन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडेतीन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा
साडेतीन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा

साडेतीन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : राज्य शिक्षण मंडळाची दहावीची लेखी परीक्षा गुरुवार (ता. २) पासून राज्यभरात सुरू होत असून मुंबई विभागातून ३ लाख ५४ हजार ४११ विद्यार्थ्यांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. २५ मार्चपर्यंत चालणाऱ्या परीक्षेला राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ५ हजार ३३ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. मुंबई विभागात तब्बल १ हजार ४९ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.

मुंबई विभागातील परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून अनेक प्रकारची तयारी करण्यात आली असून त्याच पार्श्वभूमीवर ७० परीक्षक कार्यरत असणार आहेत. पहिला पेपर मराठी विषयाचा आहे. सकाळच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सकाळी साडेदहा वाजता केंद्रावर उपस्थित राहावे. दुपारच्या सत्रातील परीक्षार्थींनी २.३० वाजता उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंडळाने प्रसिद्ध केलेल्या छापील वेळापत्रकाआधारेच विद्यार्थ्यांनी परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी केले आहे. मुंबई विभागात ठाणे जिल्ह्यातून तब्बल १ लाख १६ हजार ९७६ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.

शिक्षण मंडळाने यंदा परीक्षेच्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचनासाठी देण्याची सुविधा बंद केली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या विद्यार्थ्यांची काही कारणास्तव प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा होऊ शकली नसेल तर लेखी परीक्षेनंतर २७ ते २९ मार्चदरम्यान आऊट ऑफ टर्न पद्धतीने ती घेतली जाणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भरारी पथकांची यंत्रणा सज्ज
दहावीची परीक्षा मुंबई विभागात कॉपीमुक्त व्हावी म्हणून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्राथमिक, माध्य‍मिक, निरंतर आदी विभागांसह ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यांतील मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अधिकारी यांच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी नऊ भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. सोबत महिला भरारी पथकेही असतील.

परीक्षा केंद्रावर तपासणी
परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा केंद्रावर तपासणी केली जाणार आहे. परीक्षा काळात प्रश्नपत्रिका मोबाईलवर वा अन्य समाजमाध्यमातून व्हायरल झाल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे.

मुंबई विभागातील आकडेवारी

जिल्हा विद्यार्थी परीक्षा केंद्र
मुंबई दक्षिण ३०८४७ १२२
मुंबई पश्चिम ६१२२० २३६
मुंबई उत्तर ४८२४३ १६९
ठाणे ११६९७६ ३३२
रायगड ३५९४३ ११६
पालघर ६११८२ ७४

एकूण ३५४४११ १०४९
---

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन
राज्य शिक्षण मंडळ ः ०२०-२५७०५२७१ / ०२०-२५७०५२७२
मुंबई विभाग ः ०२२-२७८८१०७५ / ०२२-२७८९३७५६