मुलांच्‍या आरोग्‍यावर लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांच्‍या आरोग्‍यावर लक्ष
मुलांच्‍या आरोग्‍यावर लक्ष

मुलांच्‍या आरोग्‍यावर लक्ष

sakal_logo
By

मुलांच्‍या सुदृढतेसाठी प्रयत्‍न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : जागरूक पालक, सुदृढ बालक कार्यक्रमांतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांत १८ वर्षांखालील मुलांची आरोग्य तपासणी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ८५ लाख १८ हजार मुलांची तपासणी करण्यात आली असून त्‍यातील ६,८४,१४५ म्‍हणजे साधारण आठ टक्‍के मुले आजारी असल्याचे आढळून आले. त्यापैकी सुमारे ५,००,३६४ मुलांवर तातडीने उपचार करण्यात आले; तर २,२३,७२९ मुलांना सखोल उपचारांसाठी पुढे पाठवण्यात आले असल्याचे राज्य आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्‍‌याने सांगितले. दरम्यान, या कार्यक्रमांतर्गत मुंबईत २ लाख ७९ मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
राज्‍यभरातील तपासणीत आढळलेल्‍या कुपोषण, लठ्ठपणा आणि दंत समस्या यांसारख्या आजारांवर बारकाईने लक्ष ठेवत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमात ३७,४४८ आशा आणि अंगणवाडी सेविकांची महत्त्‍वपूर्ण मदत होत असून सुमारे ५०,६८६ शाळांची तपासणी करण्यात आली आहे.

मुंबईत २ लाख ७९ मुलांची तपासणी
‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ या अभियानांतर्गत २७ शालेय आरोग्य पथक, ५९ आरबीएसके पथके व १६१ विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या बाल आरोग्य पथकामार्फत तपासणी करण्यात येत असून त्यामधील आवश्यकतेनुसार बालकांना संदर्भित पहिल्या, दुसऱ्‍‌या, तसेच तिसऱ्‍‌या स्तरावर उपचारांकरिता प्रसूतिगृहे व दवाखाने, सर्वसाधारण रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालये येथे पुढील उपचार व मार्गदर्शनाकरता पाठविण्यात येत असल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. उर्वरित बालकांची तपासणी मार्च २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे.

मुंबईत सुमारे २५ लाख मुले असून त्यांच्या तपासणीसाठी थोडा वेळ लागेल. मात्र शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दररोज तपासणी सुरू असून तपासणीदरम्यान काय आढळले यावर भाष्य करणे आता घाईचे ठरू शकते. कारण अनेक पात्र मुलांची तपासणी करणे बाकी असून ती संख्या मोठी आहे.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

तपासणी
वाढत्या वयातील मुलांमधील आजार, कमतरता, उणिवा आणि शरीर विकासातील विकार यांची तपासणी.

आतापर्यंत तपासणी केलेले :
शहर मुलांची संख्या
पुणे ५.९३ लाख
नगर ५.१८ लाख
सोलापूर ४.६२ लाख
नाशिक ३.९६ लाख
बीड ३.१४ लाख
सातारा ३.०८ लाख
मुंबई २.७९ लाख