
सेवानिवृत्तीच्या निर्णयावरून नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, शीव, कूपर आणि दंत महाविद्यालयातील संचालक, अधिष्ठाता आणि अध्यापक यांचे सेवानिवृत्ती वय ६२ वरून ६४ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला महापालिकेतील शिक्षकांनी विरोध केला आहे. यासदर्भात शुक्रवारी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना हा निर्णय मागे घेण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे. निर्णयाचा फेरविचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील संचालक, अधिष्ठाता आणि अध्यापक यांचे वय ६२ वरून ६४ करण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेने परिपत्रकाद्वारे जाहीर केला. यामुळे महापालिकेच्या सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय (केईएम रुग्णालय), टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय (नायर रुग्णालय), लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय (शीव रुग्णालय) आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय (कूपर रुग्णालय) आणि नायर दंत महाविद्यालय या पाच महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या अध्यापकांचे सेवानिवृत्ती वय ६२ वरून ६४ वर्षे करण्यात आले आहे. या निर्णयाचा फटका महापालिकेतील साधारणपणे एक हजारपेक्षा जास्त शिक्षकांना बसणार आहे. यातील अनेक शिक्षकांनी पदोन्नतीसाठी आवश्यक असलेले पात्रतेचे निकष पूर्ण केले आहेत. यामुळे सहायकपदावर कार्यरत असलेले अनेक तरुण, मेहनती, उत्साही आणि सर्वोत्तम सेवा देण्यास इच्छुक असलेले शिक्षक हे पदोन्नत्तीपासून वंचित राहणार आहेत. तीन ते चार कनिष्ठ प्राध्यापकांचे वेतन हे एका वरिष्ठ प्राध्यापकाच्या वेतनाइतके असते. त्यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड महापालिकेच्या तिजोरीवर पडेल. त्यामुळे महापालिकेतील शिक्षकांची संघटना असलेल्या बृहन्मुंबई महापालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे.
...
...अन्यथा तीव्र आंदोलन
बृहन्मुंबई महानगरपालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महानगरपालिका आयुक्त यांना नोव्हेंबरमध्ये पत्राद्वारे प्राध्यापकांचे वय वाढवण्यात येऊ नये, अशी विनंती केली होती. यासंदर्भात शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेऊन त्यांना हा निर्णय मागे घेण्यासंदर्भात विनंती करण्यात येणार आहे. त्यानंतरही निर्णय कायम ठेवल्यास आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे सचिव डॉ. रवींद्र देवकर यांनी दिली.