
महापालिकेच्या शैक्षणिक फंडात खडखडाट
मुंबई, ता. २ : अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केल्याचा आव आणणाऱ्या महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. महापालिकेच्या शैक्षणिक कार्यक्रम फंडात सध्या अवघे ८४ लाख रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेला ‘इंद्रधनुष्य टॅलेंट शो’ अडचणीत आला आहे. आता हा शो घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी राखीव असलेल्या निधीतून पाच कोटी रुपये उचलण्यात येणार आहेत.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी क्रीडा स्पर्धा, शिबिरे, स्वसंरक्षण प्रशिक्षण आदी उपक्रम आयोजित केले जातात. हा उपक्रम शालेय स्तरावर होत असल्याने विद्यार्थ्यांच्या कौशल्य, कला-गुणांचा प्रचार, प्रसार मर्यादित राहतो. कलागुणांचा अधिकाधिक प्रसार होऊन विविध स्तरावरील उपक्रमांत विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे, यासाठी २०१९-२० या वर्षापासून ‘रायझिंग स्टार’ हा भव्य कार्यक्रम पालिकेकडून आयोजित करण्यात येतो. या धर्तीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ‘इंद्रधनुष्य टॅलेंट शो’ हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय उपायुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला; मात्र पालिकेच्या शैक्षणिक फंडामध्ये अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत. महापालिकेच्या शिक्षण विषयक कार्यक्रम निधीत अवघे ८४ लाख रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाच्या जाहिराती व प्रसिद्धीसाठी असलेला पाच कोटींचा निधी वापरण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्त व प्रशासकाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.