भिन्नधर्मीय प्रेमसंबंधाचा थेट लव्ह जिहादशी संबंध लावू नये! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिन्नधर्मीय प्रेमसंबंधाचा थेट
लव्ह जिहादशी संबंध लावू नये!
भिन्नधर्मीय प्रेमसंबंधाचा थेट लव्ह जिहादशी संबंध लावू नये!

भिन्नधर्मीय प्रेमसंबंधाचा थेट लव्ह जिहादशी संबंध लावू नये!

sakal_logo
By

भिन्नधर्मीय प्रेमसंबंधाचा थेट
लव्ह जिहादशी संबंध लावू नये!
उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
मुंबई, ता. २ : दोन भिन्नधर्मीय युवक-युवतींचे प्रेमसंबंध असतील, तर लगेच त्याचा संबंध लव्ह जिहादशी लावण्याची आवश्यकता नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले आहे. या प्रकरणातील मुस्लिम युवती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
सदर प्रकरणात मुस्लिम युवतीचे एका अनुसूचित जातीतील युवकाशी प्रेमसंबंध होते; पण त्याने ही गोष्ट दडवून ठेवली होती. मुलीने त्याला धर्मांतर करायला सांगितले. मुलीच्या पालकांनी प्रेमसंबंधास विरोध केला नाही आणि मुलीनेदेखील मान्यता दिली; मात्र पुढे त्यांच्यात नाते बिघडले. याप्रकरणी मुलाने युवती आणि तिच्या कुटुंबीयांवर लव्ह जिहादचा आरोप केला आणि त्यांच्याविरोधात मुलाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी औरंगाबादमधील न्यायालयाने संबंधित मुलगी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर न्या. विभा कनकवाडी आणि न्या. अभय वागवसे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने या निकालात लव्ह जिहादवर महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.
---
काय म्हणाले न्यायालय?
१. तक्रारदार संबंधित मुलीच्या प्रेमात होता आणि अनेकदा संधी असूनही त्याने हे नाते सोडण्याचा प्रयत्न केला नाही, हे त्याने स्वतः मान्य केले आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. २. लव्ह जिहाद ही कट्टरतावाद्यांनी रुजवलेली संकल्पना असून त्याला कोणताही आधार नाही. यामध्ये हिंदू मुलीला मुस्लिम मुलाकडून लक्ष्य करण्यात येते आणि तिचे धर्मांतर करण्यात येते, असा दावा करण्यात येतो; मात्र या प्रकरणात पीडित मुलगा आहे हे विशेष आहे.
३. केवळ मुलगा-मुलगी दोन वेगळ्या धर्मांचे आहेत आणि ते एकमेकांच्या प्रेमात होते. परंतु आता त्यांच्यातील नाते बिघडले म्हणून त्यास थेट लव्ह जिहाद असे नाव देता येणार नाही. केवळ धर्मांतर करण्यासाठी तक्रारदाराला लक्ष्य केले, असेही म्हणता येणार नाही, असे स्पष्ट निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आणि अटकपूर्व जामीन मंजूर केला.