पाठ्यपुस्तकांच्या किमती वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाठ्यपुस्तकांच्या किमती वाढणार
पाठ्यपुस्तकांच्या किमती वाढणार

पाठ्यपुस्तकांच्या किमती वाढणार

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : पाठ्यपुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्येच वहीची पाने समाविष्ट करण्यात येणार असल्याने पाठ्यपुस्तकांच्या किमती भरमसाठ वाढणार असल्याने पालकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे.
राज्यातील सरकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, तसेच अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकाचे ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने या पाठ्यपुस्तकांमध्येच वहीची पाने समाविष्ट करण्यासाठीच्या धोरणासंदर्भातील निर्णय आज जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वहीची पाने जोडलेली नवीन पाठ्यपुस्तके २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कागदाच्या दरात झालेली वाढ लक्षात घेऊन या पाठ्यपुस्तकांच्या किमती वाढवल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाने काढलेल्या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. या नवीन पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून राज्यातील कोट्यवधी पालकांना नवीन पुस्तकांच्या वाढीव किमतीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.
...
सरकारी आणि अनुदानित शाळांना...
पाठ्यपुस्तकांना वह्या जोडण्याची ही प्रक्रिया तूर्तास सरकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित आधी शाळांमध्ये लागू असली तरी खासगी संस्थांना मात्र त्यासाठी बंधनकारक करण्यात आले नाही. त्यांना मंडळाकडे शिल्लक असलेल्या यापूर्वीचा साठा वापरण्याची मुभा तूर्तास देण्यात आली आहे. ती पुस्तके संपल्यानंतरच नवीन पुस्तके खासगी शाळांना वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा वापर खासगी शाळांमध्ये करता येईल, असे शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या जीआरमधून स्पष्ट झाले आहे.
...
वह्या लागणारच!
इयत्ता तिसरी ते दहावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांसाठी ही योजना लागू करण्यात आली असून प्रत्येक घटक पाठ किंवा कविता याच्या शेवटी वहीची एक ते दोन पृष्ठे जोडण्यात येतील. शिक्षक शिकवत असताना मुद्द्याच्या नोंदी होण्यासाठी ही पाने जोडली जातील. विद्यार्थ्यांना आपल्या सराव, वर्गकार्य, गृहपाठ इत्यादींसाठी मुलांना वेगवेगळ्या वह्या घेण्याची मुभा मिळणार आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांना काही वह्यांची पाने जोडण्यात आली असली तरी वह्यांची संख्या मात्र फार घटली जाणार नसल्याचे शिक्षण तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
...
अशी असेल प्रक्रिया..
- पहिली ते आठवीतील पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपात एकूण चार भागांमध्ये विभागून तयार करण्यात येतील. त्यामध्ये प्रत्येक घटक पाठ, कविता, यानंतर वहीचे एक पान समाविष्ट करण्यात येईल.
- आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांमध्ये अनिवार्य विषयांची एकूण चार विभागांमध्ये विभागणी केली जाईल, तसेच श्रेणी व वैकल्पिक विषयांची पुस्तके स्वतंत्ररीत्या उपलब्ध करून दिले जाणार आहेत.