अपडेटेड जगण्याच्या इच्छाशक्तीने कर्करोगावर मात करता येते कर्करोगाने मला जगण्याचे बळ दिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपडेटेड  जगण्याच्या इच्छाशक्तीने कर्करोगावर मात करता येते कर्करोगाने मला जगण्याचे बळ दिले
अपडेटेड जगण्याच्या इच्छाशक्तीने कर्करोगावर मात करता येते कर्करोगाने मला जगण्याचे बळ दिले

अपडेटेड जगण्याच्या इच्छाशक्तीने कर्करोगावर मात करता येते कर्करोगाने मला जगण्याचे बळ दिले

sakal_logo
By

अपडेटेड
दुर्दम्य इच्छाशक्तीने कर्करोगावर मात
असाध्य आजारावर मात करणाऱ्या रणरागिनींनी दिला जगण्याचा मूलमंत्र

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईसह संपूर्ण देशात कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. २०२५ पर्यंत कर्करुग्णांच्या संख्येत १२.८ टक्के वाढ होणार असल्याचे आयसीएमआरचा अहवाल सांगतो. मुंबईतील टाटा रुग्णालयात देशभरातून येणाऱ्या हजारो रुग्णांच्या गर्दीवरून त्याबाबतचा अंदाज लावता येऊ शकतो. कर्गरोग जीवघेणा आजार असला तरी असाध्य नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी रुग्णाला उपचारांसोबत तीव्र मानसिक इच्छाशक्तीही लागते. ३० वर्षांची तरुणी ते ७२ वर्षांच्या आजोबांनीही अशा दुर्धर आजाराशी यशस्वी झुंज दिली आहे. ‘पहिले माझे कर्तव्य’ फाऊंडेशनतर्फे कर्करोगावर मात केलेल्या ११ वॉरियर्सचा नुकताच गौरव करण्यात आला. त्यांच्या जिद्दीची कहाणी नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

सकारात्मकतेने जिंकली लढाई
वर्षा पोपटानी
व्यवसाय ः एचआर
मुंबईतील ३२ वर्षीय वर्षा पोपटानी यांना ३० डिसेंबर २०२१ रोजी स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. दुसऱ्या दिवशी त्या बाळाला जन्म देणार होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आई-वडिलांचे छत्र गमावले होते. रक्ताच्या कर्करोगाने वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा वर्षा तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या. दोनच महिन्यांत त्यांची आईही गेली. दोन्ही दुःखांतून सावरत असतानाच त्यांना उजव्या स्तनात गाठ असल्याचे जाणवले. स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन गाठीची बायोप्सी केली. महिनाभराच्या वैद्यकीय तपासणीनंतर कर्करोगाचे निदान झाले. निदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी वर्षा यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त करावा की कर्करोग झाल्याच्या दुःखात रडावे, अशी त्यांची मानसिक अवस्था झाली होती. अशाच स्थितीत प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. मंदार नाडकर्णी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू झाले. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात केमोथेरपीला सुरुवात झाली. केमोरेथेरपीदरम्यान प्रचंड वेदना होत असत. आठ केमोथेरपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया करून त्यांची गाठ काढून टाकण्यात आली. पुन्हा रोग परतू नये म्हणून वर्षा यांनी २१ रेडिएशन थेरपी घेतल्या. आयुष्याच्या कठीण प्रवासात पहिल्या दिवसापासून पती आणि सासू-सासऱ्यांनी भक्कम साथ दिल्याचे वर्षा सांगतात. मी न खचता कायम सकारात्मक राहिले. माझ्या बाळाने मला बरे होण्याची उमेद दिली. मी आता रोगातून पूर्णपणे बरी झाले आहे, असे सांगताना वर्षा यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

मन की जीतही जीत है!
शिखा सिंह
व्यवसाय ः शिक्षिका
बिहारच्या ३० वर्षांच्या शिखा सिंह यांना वर्षभरापूर्वी छातीत दुखायला लागले. खबरदारी म्हणून त्यांनी सर्व तपासण्या करून घेतल्या. जानेवारी महिन्यात ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याचे कळल्यावर उत्साहाने भरलेल्या शिखा पार कोमेजून गेल्या. त्यांनी मुंबईतील टाटा रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी त्यांना रक्ततपासणीसाठी बोलावले होते; पण उद्याच शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. शस्त्रक्रिया म्हटल्यावर मी खूपच घाबरले होते; पण डॉक्टरांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने परिस्थिती हाताळली, असे शिखा सांगतात. सध्या त्या असाध्य रोगातून बऱ्या होत आहेत. डॉ. शलाका जोशी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ‘कठीण वेळ माणसाला अधिक सशक्त बनवते. कर्करोगावरील उपचारांदरम्यान मला याची अनुभूती आली. मला होत असलेल्या वेदनांमुळे मी माझी आंतरिक शक्ती ओळखू शकले. त्यामुळे आज मी कुठल्याही कठीण परिस्थितीशी सामना करण्यास तयार आहे. शेवटी मनातून एखाद्या गोष्टीवर विजय मिळवलात तर प्रत्यक्षात विजयी होणे शक्य आहे,’ असे शिखा सांगतात.

घरच्यांच्या भक्कम साथीने जिंकले लढाई
शीतल म्हस्के
गृहिणी

धारावीत राहणाऱ्या ३७ वर्षीय शीतल म्हस्के यांनी काही महिन्यांपूर्वी कर्करोगावर मात केली. कोविड काळात त्यांच्या डाव्या स्तनात दुखू लागले. स्थानिक डॉक्टरांच्या तपासणी अहवालात काहीच निदान झाले नाही; पण स्तनातील गाठ दिवसरात्र झोपू देत नव्हती. स्थानिक डॉक्टरांनी ती काढून टाकली; परंतु बायोप्सीत ती कर्करोगाची असल्याचे निदान झाले. ‘घरची परिस्थिती अत्यंत वाईट होती. कोविड काळात पतीची नोकरी गेली. घरात अनेक समस्या होत्या. पहिल्या शस्त्रक्रियेवेळी किमान ३० ते ४० हजार रुपये खर्च आला होता. कर्तव्य फाऊंडेशनच्या मदतीने पहिली शस्त्रक्रिया केली. त्यानंतर कामा रुग्णालयात आठ वेळा केमोथेरपी आणि २५ वेळा रेडिएशन घेतल्यानंतर मी पूर्णपणे कर्करोगमुक्त झाले. मला पाच वर्षांची मुलगी आहे. आजारपणाच्या काळात पतीने माझी खूप काळजी घेतली. घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय कर्करोगाविरोधातील मोठी लढाई जिंकणे कठीण होते, असे शीतल म्हस्के यांनी सांगितले.


जनजागृती आवश्यक
शर्मिला सरकार
व्यवसाय ः रुग्णालय अधिकारी
नवी मुंबईत राहणाऱ्या शर्मिला सरकार एमजीएम रुग्णालयात वरिष्ठ पदावर काम करतात. नेहमीप्रमाणे जुलैमध्ये रुग्णालयामार्फत करण्यात आलेल्या वार्षिक आरोग्य तपासणीत त्यांच्या स्तनात एक छोटी गाठ आढळली. तात्काळ त्यांनी रुग्णालयातील ऑन्कोलॉजिस्टची भेट घेतली. छोटी गाठ काढून १५ रेडिएशन थेरपीचे सेशन पूर्ण केले. निदान लवकर झाल्याने एका महिन्याच्या सुट्टीनंतर मी कामावर रुजू झाले. आता आजारातून बाहेर पडल्यानंतर मी स्वतः कर्करोगासंदर्भातील समुपदेशन करते. लवकर निदान आणि तात्काळ उपचार सुरू केले की जीव वाचतो आणि सर्वसामान्य आयुष्य जगता येते. त्यासाठी कर्करोगाबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करणे आवश्यक आहे. मी अशा वेदनेतून गेल्यामुळे माझ्या परीने जनजागृती करते, असे त्या सांगतात.

मी बरा झालो, तुम्हीही व्हाल!
ब्रीजभूषण चांखोडी
सेवानिवृत्त
कल्याणमध्ये राहणारे ८२ वर्षीय ब्रीजभूषण चांडोखी यांना त्यांच्या वयाच्या ७२ व्या वर्षी गळ्याचा कर्करोग झाला. ऑक्टोबर २०१२ मध्ये अचानक ताप आला. तेव्हा जेवण करताना त्यांना त्रास होऊ लागला. कान-नाक-घसा तज्ज्ञांनी त्यांना बायोप्सी करण्याचा सल्ला दिला. बायोप्सी अहवालात गळ्याच्या आतील भागाला कर्करोग झाल्याचे निदान झाले. फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले. आठ महिन्यांच्या उपचारांनंतर त्यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली. २१ दिवसांच्या कालावधीत एक केमोथेरपी अशा पद्धतीने एकूण आठ केमो त्यांनी घेतल्या. ‘डॉक्टरांच्या औषधासोबत कुटुंबाचा मोठा आधार मला होता. कुटुंब काय असते, ते कर्करोग झाल्यावर मला समजले असे ते सांगतात. दिवस निघून गेले आणि मी बरा झालो. त्यानंतर एका महिन्यानंतर मी वैष्णोदेवीचे पायी जाऊन दर्शन घेऊन आलो. आता मी आठवड्यातून पाच वेळा जीमला जातो. वर्षातून एकदा चार ते पाच कर्करुग्णांना भेटतो. मी बरा झालोय, तुम्हीही व्हाल, असा धीर देऊन त्यांना प्रोत्साहित करतो, असे चांडोखी यांनी सांगितले.

स्वतःच्या अनुभवातून संस्थेची उभारणी
स्तनाचा कर्करोग आपल्याबरोबर काही विचित्र समजुती आणि बरीचशी आव्हाने घेऊन येतो; मात्र वेळेवर झालेले निदान आणि उपचारांमुळे मी त्यातून बाहेर पडू शकले. इतरांच्या वाट्याला असे येऊ नये म्हणून मी देशभरात महिलांना स्तनाच्या कर्करोगासाठी नियमित तपासण्या करून घेण्याकरिता प्रोत्साहित करते, असे नैना कनाल म्हणतात. लवकर निदान झाल्याने जीवदान मिळण्याची टक्केवारी तर वाढतेच; पण किमान गुंतागुंतीसह उपचार देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आपल्या अनुभवांमुळे नैना कनाल यांनी ‘माझे कर्तव्य’ संस्था सुरू केली. कर्करोगाच्या वेगवेगळ्या उपचार पद्धतींमुळे मी केसही गमावले; पण जगण्याचा निर्धार कायम होता. तोच निर्धार आणि आशा मला लाखो महिलांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अशी करा कर्करोगावर मात
- नेहमी सकारात्मक राहा
- जगण्याची इच्छाशक्ती प्रबळ ठेवा
- कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नका
- स्वतःला कायम प्रोत्साहित करत राहा
- शंका आल्यावर तपासणी, लवकर निदान आणि उपचार घ्या
- कुटुंबाचा भक्कम पाठिबा हवा