सीईटी परीक्षेची ‘ॲप’वरून नोंदणी होणार

सीईटी परीक्षेची ‘ॲप’वरून नोंदणी होणार

मुंबई, ता. ३ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा यंदा नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे. पहिल्यांदाच उमेदवारांना परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. ही सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती सीईटी सेल आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी मुंबईत दिली. यावेळी प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे. पी. डांगे उपस्थित होते.

राज्यात उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी, कला संचालनालय आदी शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विषयाच्या १८ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा सीईटी सेलमार्फत घेतल्या जाणार आहेत. या सर्व परीक्षा, त्यांच्या प्रक्रियेचे वेळापत्रक आणि एकूण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमानुसार जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व परीक्षा आणि त्यांचे निकाल जाहीर केले जाणार असल्याने ऑगस्ट महिन्यात राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि त्यांचे शैक्षणिक सत्र सुरू होईल. त्यासाठी सीईटी सेलने नियोजन केल्याची माहिती देण्यात आली.

परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये २४० परीक्षा केंद्र असतील. तर सीईटीच्या विविध परीक्षा इतर १० राज्यातील केंद्रांवरही घेतल्या जाणार असून यामध्ये एमबीए, एमसीए आदींच्या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची संख्या आणि परीक्षा केंद्रावरील उपलब्ध सोयी सुविधा लक्षात घेऊन गरज पडल्यास अधिक परीक्षा केंद्र वाढविले जातील, असे सूतोवाच आयुक्तांनी केले.

संकेतस्थळावर वेळापत्रक
राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ५९ अभ्यासक्रम असून त्यातील काही अभ्यासक्रमांचे प्रवेश इतर केंद्रीय आणि इतर माध्यमातून घेतले जातात. तर राज्य सीईटी सेलच्या एकूण १८ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाते. यातील चार अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सेलने https://mahacet.org या संकेस्थळावर उपलब्ध करून दिले असून त्यातील माहितीप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन आयुक्त वारभुवन यांनी केले.

...असे आहे नियोजन
- सीईटी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र सादर करणे, वेळोवेळी अद्ययावत माहिती मिळविणे व इतर आवश्यक प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रियेसंबंधी माहिती उमेदवारांना त्वरीत मिळणे या उद्देशाने भ्रमणध्वनी व टॅब्लेटमध्ये अँड्रॉइड आणि आयओएस कार्यप्रणालीवर आधारीत मोबाईल प्रणाली उपलब्ध होईल.
- परीक्षा केंद्रावर नियुक्त करावयाच्या मनुष्यबळाच्या संख्येत वाढ केल्याने परीक्षा केंद्रासाठी एक नोडल लॉग-इन, एक केंद्र प्रमुख, एक सर्व्हर व्यवस्थापक, एक नेटवर्क तज्ज्ञ, २५ परीक्षार्थी उमेदवारांमागे एक समवेक्षक, १०० परीक्षार्थी उमेदवारांमागे एक सुरक्षारक्षक, एक महिला व एक पुरुष तपासणीस, एक मुख्य पर्यवेक्षक, एक-एक पुरुष-महिला हवालदार उपलब्ध केली जाईल.
- हॉल तिकीट आणि गुणपत्रिकेवर त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी तसेच सत्यता पडताळण्यासाठी बारकोड, क्यु आर कोड दिला जाईल. प्रवेश परीक्षेचे गुणपत्रक उमेदवाराच्या लॉग-ईनमधून छापण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com