
मेट्रो-२ ए मार्गावरील नऊ स्थानकांचे सुशोभीकरण पुर्ण
मुंबई, ता. ७ : पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाघाटन झालेल्या मेट्रो-२ ए मार्गावरील नऊ स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी अंदाजे १८०० टन स्टील, ४८० मेट्रिक टन प्लॉस्टर आणि अंदाजे चार लाख चौरस फूट अधिक लुव्हर वापरण्यात आले आहे.
गोदरेज इंटिरिओतर्फे या मेट्रो स्थानकांच्या बाह्य दर्शनी भागाचे काम यशस्वीरीतीने पूर्ण करण्यात आले असून हा प्रकल्प कोविड साथीच्या काळात सुरू झाला आणि एमएमआरडीएने दिलेल्या निर्धारित मुदतीपूर्वीच पूर्ण झाल्याची माहिती गोदरेज इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसायप्रमुख स्वप्नील नगरकर यांनी दिली. सन २०३१ पर्यंत दहा लाख प्रवासी या मेट्रो सेवेचा वापर करतील. गोदरेज इंटेरिओने यापूर्वी बंगळूर, कोची आणि कोलकाता यासह देशभरातील विविध मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे काम केले आहे. जगाच्या अनेक शहरांमधील मेट्रो स्थानके त्या त्या शहरांची संस्कृती प्रतिबिंबित करतात. त्यामुळे ग्राहकांच्या विनंतीनुसार गोदरेज इंटेरिओनेदेखील भारतीय शहरातील वेगवेगळ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये कलाकृतींच्या माध्यमातून त्या शहरांमधील सांस्कृतिक वैभव दाखवले आहे. गोदरेज इंटिरिओला २०२० पासून पायाभूत सुविधांचे पाचशे कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे प्रकल्प मिळाले आहेत. यात इंटेरियर, आर्ट फॉर्म, आर्किटेक्चरल फिनिश, सिव्हिल फिनिश, क्लॅडिंग, ब्लॉक वर्क आणि बाह्य ग्लेझिंग यांचा समावेश आहे.