
निर्भया फंडातून पॅनिक बटण लावण्यासाठी निधी द्या
निर्भया फंडातून पॅनिक बटण लावण्यासाठी निधी द्या
मुंबई टॅक्सी मेन्स युनियनची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने महिलांच्या सुरक्षेसाठी काळी-पिवळी टॅक्सीमध्ये पॅनिक बटण लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने जुन्या टॅक्सी चालकांनासुद्धा आता पॅनिक बटण लावणे अनिवार्य केले आहे; मात्र गेल्या ६० वर्षांत टॅक्सीचालकांकडून महिला प्रवाशांच्या विनयभंगाची एकही तक्रार आलेली नाही. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या टॅक्सी चालकांवर पॅनिक बटणाची सक्ती करू नये किंवा पॅनिक बटण बसवण्यासाठी लागणारा खर्च निर्भया फंडातून देण्याची मागणी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने परिवहन प्रधान सचिवांकडे केली आहे.
मुंबई शहरातील टॅक्सीमध्ये पॅनिक बटण बसवणे राज्य सरकारने अनिवार्य केले आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसा आणि रात्री मोठ्या संख्येने महिला टॅक्सीतून प्रवास करतात; मात्र टॅक्सी चालकांकडून विनयभंगाची किंवा कोणत्याही प्रकारची छळवणूक झाल्याची एकही तक्रार नाही. गेल्या ६० वर्षांपासून विनयभंगाची किंवा कोणत्याही प्रकारची छळवणूक झाल्याची टॅक्सीचालकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांच्या प्रवासासाठी टॅक्सीचा प्रवास करणे अत्यंत सुरक्षित आहे. आंतरशहरांमध्ये चालणाऱ्या टॅक्सींमध्येही टॅक्सीचालकांविरुद्ध एकही तक्रार नसल्याने पॅनिक बटण बसवण्याचा आग्रह का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गरीब टॅक्सी चालकांना पॅनिक बटण बसवण्यासाठी सुमारे १० ते १२ हजार रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीमुळे महागाईचे चटके सहन करणारे टॅक्सी चालक उदरनिर्वाहासाठी धडपडत असलेल्या गरीब टॅक्सीचालकांवर आर्थिक बोजा टाकण्याऐवजी निष्क्रिय पडलेल्या निर्भया फंडातून निधी द्यावा, अशी मागणी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने केली आहे.
कोरोना महामारीमुळे आधीच मुंबईतील टॅक्सींची संख्या घटली आहे. मोठ्या संख्येने टॅक्सी चालकांनी प्रवासी वाहतुकीचे काम सोडले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे टॅक्सी व्यवसाय धोक्यात आला आहे. टॅक्सी चालकांना पॅनिक बटण लावण्याची सक्ती करत असताना आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द सरकार नियंत्रण कक्ष उघडण्यात अयशस्वी झाले आहे.
- ए. एल. कॉड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सी मेन्स युनियन