
मुंबईत ढगाळ वातावरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. सकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या असल्या, तरी हवेचा स्तर न सुधारता वाईट नोंदवला गेला. ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा, यामुळे उन्हाची काहिली काहीशी कमी जाणवल्याने लोकांनी दुपारी उशिरापर्यंत धुळवड साजरी केली.
मुंबईत सोमवारी सायंकाळपासूनच धूळयुक्त सोसाट्याचा वारा सुटला होता. आज सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याचे दिसले. अधूनमधून पावसाचे थेंबही शिंतडले. यामुळे सतत तीन दिवस वाढलेले कमाल तापमान कमी झाल्याचे दिसले. सांताक्रूझ ३५.८; तर कुलाबा ३३ अंश सेल्सियसची नोंद झाली. सोमवारी अनुक्रमे ३९.८ आणि ३७ अंशांची नोंद झाली होती. कालच्या तुलनेत आज कमाल तापमानात सांताक्रूझ ३.५; तर कुलाबा ४ अंशाने कमी झाले.
सोमवारी मुंबईत जरी सोसाट्याचा वारा किंवा त्यानंतर आज पावसाचा शिडकावा झाला असला, तरी प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले नाही. मुंबईतील हवेचा स्तर २२८ एक्यूआयसह वाईट नोंदवला गेला. चेंबूर ३०५ आणि नवी मुंबई ३१६ एक्यूआयसह हवेची अतिशय वाईट स्थिती नोंदवल्याने त्यांचा समावेश ‘रेड झोन’मध्ये झाला. याशिवाय अंधेरी, भांडुप, कुलाबा, मालाड, माझगाव, बीकेसीमध्ये हवेचा स्तर वाईट नोंदवण्यात आला. वरळी १०९ आणि बोरिवली १५४ सह हवेचा स्तर मध्यम नोंदवण्यात आला.
...
परिसर एक्यूआय दर्जा
अंधेरी - २५२ वाईट
भांडुप - २४९ वाईट
कुलाबा - २१८ वाईट
मालाड - २१८ वाईट
माझगाव - २०० वाईट
बीकेसी - २२१ वाईट
चेंबूर - ३०५ अतिशय वाईट
वरळी - १०९ मध्यम
बोरिवली - १४५ मध्यम
नवी मुंबई - ३१६ मध्यम