
मुंबईतील रस्त्यांवर स्ट्रीट फर्निचर
मुंबई, ता. ८ : मुंबईतील १९ वॉर्डांमध्ये स्ट्रीट फर्निचर बसवण्यात येणार असून त्याअंतर्गत आसने, ग्लास रेलिंग्ज, फ्लॉवर पॉट्स आदींची सुविधा देण्यात येणार आहे. स्ट्रीट फर्निचरमुळे शहरांच्या सुशोभीकरणात भर पडणार असली, तरी पालिका त्यासाठी ३६० कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाअंतर्गत रस्त्यावरील फर्निचर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी त्यामुळे मदत होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे.
मुंबईच्या सुशोभीकरणावर पालिका शेकडो कोटी रुपये खर्च करत आहे. रस्त्यावरील फर्निचरवर आता ३६० कोटी खर्च केला जाणार आहे. रस्त्यावरील फर्निचर कसे बसवायचे आणि त्याचे स्वरूप काय असेल यासाठी नगररचनाकाराची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्बन प्लॅनरच्या अहवालानुसार आता मुंबईतील सहा परिमंडळांमध्ये स्ट्रीट फर्निचर बसवण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ३६० कोटी ५५ लाख रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. स्ट्रीट फर्निचरअंतर्गत एकूण १३ थीम निवडण्यात आल्या आहेत.
रस्त्यावरील फर्निचर बसवण्यासाठी पालिकेने काढलेल्या निविदेत तीन कंत्राटदार पात्र ठरले. पालिकेच्या अटींनुसार त्यांनी प्रदान केलेल्या सर्व नमुन्यांची व्हीजेटीआय इंजिनिअरिंग स्कूलच्या प्रयोगशाळेतही तपासणी करण्यात आली आहे. कामे पूर्ण करण्यासाठी रस्ते व वाहतूक विभाग आणि पूल विभाग यांच्याशी समन्वय साधला जाणार आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांत उपमुख्य अभियंता वाहतूक विभागाकडून काम केले जाणार आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशामुळे परिमंडळ एकचे चार वॉर्ड वगळता पालिकेच्या सर्व सहा परिमंडळांमधील १९ वॉर्डांत काम केले जाणार आहे. मुंबईत रस्त्यावरील फर्निचर बसवण्यासाठी २४३ कोटी ४३ लाख ३६ हजार २९२ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले; मात्र ही रक्कम अपुरी असल्याचे ठेकेदाराने सांगितले. वाटाघाटीनंतर कमीत कमी अंदाजे रक्कम वाढवण्यात आली. सर्व करांसह ती ३६० कोटी ५५ लाख १८ हजार ९०८ रुपये झाली आहे.
स्ट्रीट फर्निचरअंतर्गत होणारे सुशोभीकरण
- पिगमेंटेड काँक्रीट तयार दंडगोलाकार जागा
- चौकोनी जागा
- डस्टबिन
- वर्तुळाकार ट्री ग्रेड
- रेक्टँगुलर ग्लास फायबर रेनफोर्स्ड पॉटर
- प्लांट प्लॅनर
- पदपथासाठी फायबर ग्लास कंपोझिट रेलिंग
- ग्लास फायबर आणि बसण्यासाठी पॉलिमर बेंच
- ९०० मिमी उंच ग्लास फायबर बोलार्ड
- ६०० मिमी बोलार्ड
- ४० लिटर क्षमतेचा स्टेनलेस स्टीलचा डबा