
राखीविरोधातील तक्रारीवर दोन आठवडे कारवाई नको!
मुंबई, ता. ८ : मॉडेल राखी सावंत हिच्याविरोधात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीवर आणखी दोन आठवडे कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले.
मागील वर्षी राखीने एका पत्रकार परिषदेत काही व्हिडीओ तक्रारदार अभिनेत्रीविरोधात दाखवले होते आणि गंभीर आरोपही केले होते. याबाबत मॉडेलने आंबोली पोलिस ठाण्यात राखीच्या विरोधात भादंवि कलम ३५४ अ (लैंगिक अत्याचार), ५०० (मानहानी), ५०९ (विनयभंग) आदी आरोप केले आहेत. यामध्ये अटक होण्याच्या शक्यतेने राखीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने यापूर्वी पोलिसांना याबाबत कोणतीही कठोर कारवाई करण्यास मनाई केली आहे. आज न्यायालयाने हा अवधी आणखी दोन आठवड्यांनी वाढवला. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. तसेच राखीने मोबाईलमधील काही संवाद डिलिट केल्याचा दावा न्यायालयात केला आहे. यापूर्वी दिंडोशी सत्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.