
विकलांग भावाच्या देखभालीसाठी बदली रद्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : भाऊ मानसिक विकलांग आहे आणि त्याची देखभाल करायची आहे, या कारणामुळे मुंबई उच्च न्यायालयाने एका महिला सरकारी कर्मचाऱ्याची बदली रद्दबातल केली आहे. भावाची देखभाल करण्यासाठी बहिणीने बदली रद्द करण्याची मागणी केली होती. सरकारी सेवेत असलेल्या याचिकादार महिलेची बदली २०२१ मध्ये करण्यात आली होती; मात्र त्या वेळी उच्च न्यायालयाने यावर अंतरिम स्थगिती दिली होती.
नुकतीच प्रभारी मुख्य न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर अंतिम सुनावणी झाली. याचिकेत महिला आणि बाल विकास विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेला प्रतिवादी करण्यात आले होते. याचिकादार महिलेची बदली सध्या असलेल्या ठिकाणापासून ३० किलोमीटर दूर झाली आहे. त्या ठिकाणी भावासाठी शाळा नाही. त्यामुळे भावाला शाळेत ३० किलोमीटर प्रवास करून न्यावे लागणार होते.
राज्य सरकारच्या मे २०१४ च्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांची बदली करताना संलग्न परिस्थितीचा विचार करायला हवा, असे नमूद केले आहे. त्यामुळे महिलेच्या भावाच्या शिक्षणाचा विचार व्हायला हवा, तसेच मागील दीड वर्ष ही बदली स्थगित केली होती. त्यामुळे आता ती रद्दबातल करत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. महिलेच्या परिवारात आई आणि बहीण आहे. त्यामुळे ते भावाची काळजी घेऊ शकतात आणि याचिकादाराला बदलीची पुरेशी कल्पना दिली होती, असा खुलासा सरकारकडून करण्यात आला होता.