
सेमीकंडक्टरसाठी भारत-अमेरिकेत करार
मुंबई, ता. १० : मध्यंतरी साऱ्या जगात तुटवडा निर्माण झालेल्या सेमीकंडक्टर चिप पुरवठा साखळीत लवचिकता, वैविध्यता आणण्यासाठी सहयोगी यंत्रणा स्थापन करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार मंत्र्यांमध्ये आज (ता. १०) सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
आज नवी दिल्ली येथे झालेल्या ‘कमर्शिअल डायलॉग २०२३’ नंतर यासंदर्भात भागीदारी करण्याबाबत दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी करण्यात आली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जीना रायमोंडो या नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमधील नवीन व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी खुल्या करण्यासाठी व्यावसायिक संवाद पुन्हा सुरू करण्यात आला.
या सामंजस्य करारात अमेरिकेच्या चिप्स अॅण्ड सायन्स ॲक्ट आणि भारताच्या सेमीकंडक्टर मिशनच्या दृष्टिकोनातून सेमीकंडक्टर पुरवठा साखळीत लवचिकता आणि वैविध्यता यावे, यासाठी दोन्ही सरकारांमध्ये सहयोगी यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयातील दोन्ही देशांच्या सामर्थ्यांचा फायदा घेणे आणि सेमीकंडक्टर मूल्यसाखळीच्या विविध पैलूंवर चर्चा करून व्यावसायिक संधी आणि सेमीकंडक्टर शोध व्यवस्थेचा विकास करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे.